आयआयटींमध्ये मुलींच्या जागा वाढणार

By admin | Published: April 16, 2017 12:20 AM2017-04-16T00:20:37+5:302017-04-16T00:20:37+5:30

’इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींचे सध्याचे अत्यल्प प्रमाण वाढवून येत्या काही

Girls' seats will increase in IITs | आयआयटींमध्ये मुलींच्या जागा वाढणार

आयआयटींमध्ये मुलींच्या जागा वाढणार

Next

नवी दिल्ली : ’इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींचे सध्याचे अत्यल्प प्रमाण वाढवून येत्या काही वर्षांत ते किमान २० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त जागा निर्माण करून त्यावर मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘आयआयटीं’मधील प्रवेशांसंबंधीचे धोरण ठरविणाऱ्या ‘जॉइंट अ‍ॅडमिशन बोर्डा’च्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार २०१८ पासून प्रत्येक आयआयटीचे प्रवेश देताना महिलांसाठी मंजूर प्रवेश क्षमतेहून जास्तीच्या जागा (सुपरन्युमेररी) तयार केल्या जातील. प्रवेश दिलेल्या मुलींचे प्रमाण एकूण प्रवेशांच्या २० टक्के होईपर्यंत दरवर्षी अशा जादा जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल. या बैठकीस हजर राहिलेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या महिला उमेदवारांना त्यांच्या गुणांच्या टक्केवारीवर नियमित प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश मिळू शकणार नाही त्यांना वाढविलेल्या जागांवर प्रवेश दिले जातील. जास्तीत जास्त आठ वर्षे मुलींसाठी प्रवेशाच्या जागा वाढविल्या जातील. परिणामी मुलींचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा आहे. आगामी वर्षात महिलांचे प्रवेश १४ टक्के होतील अशा प्रकारे जागा वाढवल्या जातील.
एकूण २३ आयआयटी असून स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे तेथे प्रवेश मिळू शकणाऱ्या मुलींचे प्रमाण जेमतेम आठ टक्के आहे. जेईई आणि जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या आधारे प्रवेश दिले जातात. परीक्षेतील यशासाठी ठराविक शहरांतील कोचिंग क्लास लावले जातात. तेथे जाणारी बहुतांश विद्यार्थी परगावचे असतात व ते अनेक महिने क्लासच्या ठिकाणी वास्तव्य करतात. साहजिकच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व त्यांत प्रवेश मिळू शकेल एवढे यश मिळविणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी असते. सन २०१५ मध्ये आयआयटींमधील एकूण १० हजार जागांपैकी जेमतेम एक हजार जागांवर महिला उमेदवार प्रवेश मिळवू शकल्या. गेल्या वर्षी हे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होऊन आठ टक्क्यांवर आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

मुलांवर अन्याय होणार नाही
वाढीव जागा निर्माण करून त्यावर मुलींना प्रवेश देण्यात येणार असल्याने पुरुष उमेदवारांसाठी गुणवत्तेवर उपलब्ध होणाऱ्या जागांमध्ये कपात होणार नाही.

- ज्या महिला उमेदवार जेईई अ‍ॅडव्हान्स्ड उत्तीर्ण आहेत, पण गुणवत्ता क्रमानुसार ज्यांना प्रवेश मिळू शकणार नाही, अशांनाच वाढीव जागांवर प्रवेश दिले जातील.

Web Title: Girls' seats will increase in IITs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.