राष्ट्रगीत हळू आवाजात गायल्याने विद्यार्थींनींना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 10:42 AM2018-02-16T10:42:56+5:302018-02-16T10:43:50+5:30
हळू आवाजात राष्ट्रगीत गायल्याने मुलींना शिक्षा देण्यात आली.
जयपूर- सिकर जिल्ह्यात असणाऱ्या सबलपूर गावात नववी इयत्तेत शिकणाऱ्या चार मुलींना जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी सकाळी शाळेच्या राष्ट्रगीताच्या वेळी हळू आवाजात राष्ट्रगीत गायल्याने या मुलींना शिक्षा देण्यात आली.
सुत्रांच्या माहितीनुसार, राजकीय आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी मुलींना हळू आवाजात राष्ट्रगीत बोलताना पाहिलं. त्यामुळे चिडलेल्या मुख्याध्यापिकेने त्यांना शारीरिक शिक्षा देण्यास सांगितलं.
मुलींना शिक्षा म्हणून एक तास ऊठबशा काढायला लावल्या व त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. या कठोर शिक्षेमुळे मुलींच्या पायाला जबर सुज आली, अशी माहिती स्थानिक गावकऱ्यांनी दिली. पीडित मुलींना उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
विद्यार्थीनींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या पालकांनी शाळेवर धडक देऊन शाळा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली. दरम्यान, शाळेत घडलेला प्रकार आमच्यासमोर आला पण पीडित विद्यार्थीनी किंवा त्यांच्या पालकांपैकी कुणीही तक्रार दाखल करण्यासाठी आलं नसल्याचं वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.