मुलीच्या लग्नाची तयारी तशीच राहिली...

By admin | Published: November 1, 2016 05:44 AM2016-11-01T05:44:31+5:302016-11-01T09:19:22+5:30

हेडकॉन्स्टेबल रमाशंकर यादव यांच्या घरी अचानक त्यांच्या हत्येचे वृत्त धडकल्याने वातावरण पालटून गेले आहे.

Girl's wedding preparations remain ... | मुलीच्या लग्नाची तयारी तशीच राहिली...

मुलीच्या लग्नाची तयारी तशीच राहिली...

Next


भोपाळ : घरी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असताना हेडकॉन्स्टेबल रमाशंकर यादव यांच्या घरी अचानक त्यांच्या हत्येचे वृत्त धडकल्याने वातावरण पालटून गेले आहे. स्वत: रमाशंकर मुलीच्या विवाहाची उत्साहाने तयारी करीत होते. सिमीच्या अतिरेक्यांनी पळून जाण्यापूर्वी त्यांना ठार केले.
रमाशंकर यांची २४ वर्षीय कन्या सोनिया हिचा विवाह ९ डिसेंबर रोजी होणार होता, घरी आनंदाचे वातावरण असतानाच दु:खाचा डोंगर कोसळला आहे, असे त्यांचे पुतणे विजयशंकर यादव यांनी सांगितले.
माझे काका लग्नाच्या तयारीत व्यस्त होते, अचानक सोमवारी सकाळी त्यांच्या हत्येची बातमी कळली, असे ते म्हणाले. रमाशंकर यांची शंभूनाथ आणि प्रभूनाथ ही दोन मुले लष्करात असून सध्या गुवाहाटी आणि हिस्सार येथे तैनात आहेत.
बनावट चकमकीचा आरोप फेटाळला
भोपाळ पोलिसांनी सिमीच्या अतिरेक्यांना बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप फेटाळला आहे. अतिरेक्यांकडे चार गावठी बंदुका आणि धारदार शस्त्रे आढळून आली आहेत. त्यांनी गोळीबार केल्यानंतर प्रत्युत्तर देण्यात आले. पोलिसांनी ४५ ते ४६ फैरी झाडल्या होत्या, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक योगेश चौधरी यांनी पत्रकारांना दिली.अतिरेक्यांनी जोरदार गोळीबार केला. त्यांच्या धारदार शस्त्रांनी तीन पोलीस जखमी झाले आहेत, असे सांगत त्यांनी चकमकीसंबंधी विश्वासार्हतेसंबंधी साशंकता धुडकावली. चकमकीबाबत विचारले जात असलेले सर्व प्रश्न तपासाचा भाग बनले आहेत. अद्यापही तपास सुरू आहे.
चकमकीत मारले गेलेले अतिरेकी २००८ आणि २०११ मध्ये खंडवा येथे दोन कॉन्स्टेबलच्या हत्येत सहभागी होते. त्यापैकी तिघे यापूर्वी २०१३ मध्ये खंडवा येथील तुरुंगफोडीत सामील होते, अशी माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
———————————————
व्हिडीओमुळे साशंकता...
निपचित पडलेल्या मृतदेहांवर पोलीस गोळ्या झाडत असल्याचा व्हिडीओ जारी झाल्यानंतर बनावट चकमकीचा धुराळा उडाला. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता चौधरी म्हणाले की, आम्ही दिवसभर मोहिमेत गुंतलो होतो. आम्हाला व्हिडीओ बघून त्याची शहानिशा करावी लागेल. मारले गेलेले अतिरेकी गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे सांगत त्यांनी चकमकीचे समर्थन केले. आम्हाला नियमानुसार तपास करावा लागेल, सर्व घटक विचारात घ्यावे लागतील, असे ते म्हणाले; मात्र अतिरेक्यांकडे शस्त्रे नव्हती या माहितीला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. अतिरेक्यांकडे एकही मोबाईल फोन आढळून आला नाही, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Girl's wedding preparations remain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.