'दहशतवाद्यांनो; शस्त्र सोडा, माझ्याकडे भोजनाला या'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:21 PM2019-06-12T20:21:15+5:302019-06-12T20:23:01+5:30
जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची साद
श्रीनगर: हत्यारं सोडा आणि चर्चेला या असं आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हिंसेची वाट धरलेल्या राज्यातील तरुणांना केलं आहे. हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचं आवाहन मलिक यांनी तरुणांना केलं. हातात घेतलेली शस्त्रं खाली ठेवून राजभवनात भोजनाला या आणि तुम्ही निवड केलेल्या मार्गामुळे काश्मीरला काय मिळणार, ते मला सांगा, असं मलिक म्हणाले.
हिंसेची वाट धरलेल्या तरुणांनी हत्यारं खाली ठेवून चर्चेला यावं. चर्चेतून प्रश्न सुटतील. संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या त्यांच्या मागण्या चर्चेतून पूर्ण होऊ शकतील असं आवाहन मलिक यांनी केलं. हिंसेच्या माध्यमातून देशाला झुकवलं जाऊ शकत नाही, असंही ते पुढे म्हणाले. राज्याच्या प्रशासनाच्या कामगिरीची माहिती पत्रकारांना देताना त्यांनी हे आवाहन केलं.
तुमचे प्रश्न, समस्या संवादातून सुटू शकतात. तुमच्याकडे स्वतंत्र संविधान आहे. वेगळा ध्वज आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही हवं असेल, ते भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून तुम्हाला देण्यात येईल, असं मलिक यांनी म्हटलं. 'हातात शस्त्रं उचललेल्या तरुणांना त्यांनी निवडलेल्या मार्गाची कल्पना नाही. 10 वर्षांनी त्यांना याची जाणीव होईल आणि त्यावेळी त्यांच्या मनात पश्चातापाची भावना असेल,' असंदेखील राज्यपाल म्हणाले.