महात्मा फुले व सावित्रीबाईंना भारतरत्न द्या -श्रीरंग बारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 02:18 AM2019-11-20T02:18:43+5:302019-11-20T02:19:07+5:30
शेतकऱ्यांसाठी, महिला-विधवांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले
नवी दिल्ली : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी केली. ते म्हणाले की, जोतीराव फुले यांचा जन्म पुण्यात झाला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी भारतीय समाजात परिवर्तनाची चळवळ सुरू केली.
शेतकऱ्यांसाठी, महिला-विधवांच्या कल्याणासाठी महात्मा फुले यांनी आयुष्य वेचले. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण, विधवांवर होणाºया अत्याचाराविरोधात आवाज उठवला. घरात शाळा सुरू केली. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळेच भारतीय समाज, महिला प्रगती करू शकल्या. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबार्इंना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे.
शेतकºयांना मदतीसाठी चर्चा व्हावी
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी संसदेत स्वतंत्र चर्चा करण्याची मागणी रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी केली. त्या म्हणाल्या, राज्यपालांनी दोन गटांमध्ये शेतकºयांना मदत जाहीर केली आहे.
खरिपासाठी ८ हजार रुपये प्रतिहेक्टर तर हॉर्टिकल्चर करणाºया शेतकºयांना प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत दिली आहे. अनेक खासदारांना ही मदत कमी वाटते. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीदेखील शेतकºयांना मदतीची विनंती केंद्राला केला.
ते म्हणाले की, गेली दोन वर्षे दुष्काळ होता. यंदा पीक चांगले आले. कापणीची वेळ आली तेव्हा पाऊस आला. पीक हातचे गेले. सोयाबीन, द्राक्षांचे अतोनात नुकसान झाले आहे.
खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावे
कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापण्याची विनंती कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी केली. कोल्हापूर व नजीकच्या जिल्ह्यांमधील लोकांना प्रलंबित खटल्यांसाठी मुंबईत खेट्या माराव्या लागतात, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
ते म्हणाले, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील न्यायालयांमध्ये दहा लाख खटले प्रलंबित आहेत. याच खटल्यांच्या पुढील सुनावणीसाठी लोकांना मुंबईला खेट्या माºयावा लागतात.