कृषिमूल्य आयोगाची नेमणूक करून त्याला घटनात्मक दर्जा द्या- अण्णा हजारे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 05:36 PM2018-03-26T17:36:26+5:302018-03-26T17:36:26+5:30
सरकारनं ठोस निर्णय घेतल्यास विचार करू, फक्त आश्वासनं नको, ठोस निर्णय घ्या, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहेत.
नवी दिल्ली- सरकारनं ठोस निर्णय घेतल्यास विचार करू, फक्त आश्वासनं नको, ठोस निर्णय घ्या, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहेत. कृषिमूल्य आयोगाची नेमणूक करा, कृषिमूल्य आयोगाला घटनात्मक दर्जा द्या. आश्वासनांच्या पूर्ततेबाबत लेखी लिहून द्या. कृषिमूल्य आयोग राष्ट्रपतींच्या कक्षेत आणा, अशा मागण्याही अण्णांनी केल्या आहेत. रामलीलावर अण्णांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यावेळी ते बोलत होते.
शेतकरी, मजुरांच्या आर्थिक सुरक्षेची हमी द्या. 60 वर्षांच्या वरच्या शेतक-यांना 5 हजार पेन्शन मिळालीच पाहिजे. सरकारचं आयात व निर्यात धोरण चुकीचं आहे. निर्यात वाढवण्याचं धोरण राबवलं पाहिजे. इस्रायलसारखा विचार करायला शिका. बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असल्यास गावाकडे लक्ष्य केंद्रित केलं पाहिजे. शेतीतील उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. लोकशाहीत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनीही शिरकाव केला आहे. त्याला आळा घालायला हवा, असंही अण्णा हजारे म्हणाले आहेत.