पूरग्रस्त महाराष्ट्राला तातडीने मदत द्या,अर्थमंत्र्यांना भेटून खासदारांनी दिलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:35 PM2021-08-02T20:35:38+5:302021-08-02T20:37:27+5:30
महाराष्ट्रातील महापुराच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांच छळ थांबवावा आणि राज्याच्या मदतीसाठी केंद्राने तत्काळ निधी मंजूर करावा, अशा दोन मागण्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात पूरग्रस्तांना मदतीसंदर्भात काही मागण्या केल्या आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला आहे. यावेळी, केंद्राकडून सहकार्य होत असून मदतही मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. केंद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी अर्थमंत्र्यांची भेट घेण्याचेही सांगण्यात आले होते. त्यानुसार, आज खासदारांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली.
राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी आज केंद्रीय अर्थमंत्र्यांची दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्रातील महापुराच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांच छळ थांबवावा आणि राज्याच्या मदतीसाठी केंद्राने तत्काळ निधी मंजूर करावा, अशा दोन मागण्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे यांच्या पुढाकारातून मागणीचे पत्रही अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे देण्यात आले आहे.
रायगड-रत्नागिरीत पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले. #खेड शहराच्या दौऱ्यात आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या कानावर व्यापारी वर्गाच्या विमा कंपन्यांच्या अडचणी घातल्यानंतर आज दिल्लीत खा. @supriya_sule यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री ना. @nsitharaman यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. pic.twitter.com/kad20SMEKs
— Sunil Tatkare (@SunilTatkare) August 2, 2021
दरम्यान, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करुन केंद्र सरकारकडून मदत मिळवणार असल्याचं राणेंनी म्हटलं होतं. तसेच, मुख्यमंत्र्यांनीही केंद्राकडून भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून पूरग्रस्तांसाठी मागण्या केल्या आहेत. त्यावर, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.
देवेंद्र फडणवीसांना अडचणी माहिती आहेत
विजय वडेट्टीवार म्हणाले, "विरोधी पक्षाचे मागणी करणे हे काम आहे. ती त्यांची जबाबदारीच आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात ते त्यांनाही माहिती आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी करताना त्यांच्या अनेक बाबी लक्षात आल्या असतील. मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही. तर ती देताना अनेक अडचणी असतात. फक्त राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारनेही मदत करावी, अशी जनतेची मागणी आहे. आम्ही मदतीसाठी तयार आहोत. आम्ही ती सुद्धा करु".