न्याय द्या; अथवा इच्छामरणाची परवानगी द्या
By admin | Published: July 24, 2015 01:00 AM2015-07-24T01:00:44+5:302015-07-24T01:00:44+5:30
मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) महाघोटाळ्याप्रकरणी संशयाच्या घेऱ्यात अडकलेल्या ग्वाल्हेरच्या पाच विद्यार्थ्यांनी न्यायासाठी
भोपाळ : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) महाघोटाळ्याप्रकरणी संशयाच्या घेऱ्यात अडकलेल्या ग्वाल्हेरच्या पाच विद्यार्थ्यांनी न्यायासाठी थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना साकडे घातले आहे. न्याय द्या; अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे पाचही जण ग्वाल्हेरच्या गजरा राजा वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मनीष शर्मा, राघवेंद्र सिंह, पंकज बन्सल, अमित चड्ढा आणि विकास गुप्ता, अशी त्यांची नावे आहेत. या पाचही जणांनी पीएमटी-२०१० परीक्षा उत्तीर्ण करून एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता. सन २०१३ मध्ये या सर्वांना बेकायदेशीररीत्या पीएमटी परीक्षा उत्तीर्ण केल्याप्रकरणी आरोपी बनविण्यात आले होते. या पाचही जणांच्या पीएमटी प्रवेशपत्रावरील छायाचित्र आणि स्वाक्षरी महाविद्यालयाच्या ओळखपत्राशी जुळत नसल्याचे आढळल्यानंतर त्यांना आरोपी बनविण्यात आले होते. मात्र, सर्व फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट आणि अन्य चाचण्यांनंतर विशेष तपास दलाने या सर्वांना आरोपातून मुक्त केले होते. याउपरही महाविद्यालय व्यवस्थापनाकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जाते. जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण केले जाते, असा आरोप या पाचही जणांनी केला आहे. हा छळ थांबावा आणि त्यांच्याविरुद्धच्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केली आहे.
एफआयआर दाखल झाल्यानंतर महाविद्यालयाने या सर्वांना निलंबित केले होते. यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण सुरूठेवण्यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने त्यांना परवानगी दिली होती.