मला गोळ्या घाला, पण दलितांचे रक्षण करा!
By admin | Published: August 8, 2016 06:04 AM2016-08-08T06:04:18+5:302016-08-08T09:14:36+5:30
कोणाला हल्ला करायचा असेल तर तो दलितांवर नव्हे तर माझ्यावर करावा. कोणाला गोळ्या घालायच्या असतील तर त्या माझ्यावर घालाव्यात.
हैदराबाद/ नवी दिल्ली: कोणाला हल्ला करायचा असेल तर तो दलितांवर नव्हे तर माझ्यावर करावा. कोणाला गोळ््या घालायच्या असतील तर त्या माझ्यावर घालाव्यात. पण गोरक्षणाच्या नावाने दलितांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत थांबायलाच हवेत, असा
सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला. गोरक्षणाच्या नावाने दलितांवर अत्याचार करणारे वास्तवात गोरखधंद्यांची दुकानदारी करणारे समाजकंटक आहेत, असे म्हणून पंतप्रधानांनी शनिवारी टाऊनहॉलच्या कार्यक्रमात व्यक्त केलेला संताप ‘बेगडी’ असून त्यांना दलितांची आणि गायींची काळजी नसून हातातून जाणाऱ्या गुजरातची चिंता आहे, अशी टीका विरोधकांनी केल्यावर पंतप्रधान मोदी रविवारी त्याहूनही धारधार भाषेत हल्ला चढविला.
तेलंगणच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मोदींनी सकाळी व दुपारी झालेल्या सरकारी कार्यक्रमांमध्ये व सायंकाळी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपाच्या बैठकीत पुन्हा पुन्हा या विषयांचा उल्लेख केला आणि गायींबरोबर दलितांचे आणि वंचितांचे रक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे निक्षुन सांगितले. दुपारी तेलंगण सरकारच्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत हा विविधतेने नटेलला देश आहे.
देशाची एकता व अखंडता जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येकाने गोरक्षा व गोसेवा करावी, कारण गाय ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. पण त्याच बरोबर काही बनावट गोरक्षक देशात फूट पाडू पाहात आहेत. त्यांच्यापासून सावध राहून अशा लोकांना कडक शासन केले जायला हवे. असे झाले तरच भारत महान उंची गाठू शकेल.
‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानाला अभिमानानेने आपले म्हणणाऱ्या आपण भारतीयांनी दलित बांधवांना सन्मानाने वागविले नाही तर जग आपल्याला माफ करणार नाही.
- नरेंद्र मोदी,
(पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत)
गुजरातमध्ये बुडत असलेल्या भाजपाला सावरण्याचा मोदींचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधानांच्या संतापाचा राजकीय रोख समजण्यासारखा आहे. त्यांनी एक मुख्यमंत्री गमावला आहे व कदाचित ते एक राज्य गमावण्याच्या मार्गावर आहेत. पण आमची चिंता याहून मोठी आहे.
-टॉम वडक्कन, प्रवक्ते, काँग्रेस
पंतप्रधानांचा संताप बेगडी आहे कारण तो दलित मतांवर डोळा ठेवून व्यक्त केलेला आहे. त्यांना खरंच काळजी होती तर या समाजकंटकांवर याआधीच का कारवाई केली गेली नाही. कारवाई न करता केवळ संताप व्यक्त करणे म्हणजे या दुष्कृत्यांना पाठिंबा देणेच आहे.
-वृंदा करात, नेत्या, माकप
गोरक्षक नावाचा नवीनच प्रकार हल्ली पुढे आला आहे. त्यांना इतके दिवस कोणाचा आशिर्वाद होता? मोदी यापूर्वीच बोलले असते तर बरे झाले असते. परंतु आता मोदी बोलले तरी या गोरक्षकांवर काही परिणाम होईल, असे वाटत नाही.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस