मला एक संधी द्या!
By admin | Published: August 28, 2016 05:20 AM2016-08-28T05:20:51+5:302016-08-28T05:20:51+5:30
‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार
नवी दिल्ली : ‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मदत करतील, अशी मला आशा आहे, पण काश्मीर प्रश्न केवळ चर्चेनेच सुटू शकतो, रस्त्यांवर आंदोलने आणि हिंसाचार करून सुटू शकत नाही, हे लक्षात घेऊन सर्व आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे,’ असे आवाहन जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी केले.
मेहबुबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत दोघांत सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीनंतर त्या म्हणाल्या की, ‘काश्मीरमध्ये पीडीपी-भाजपाचे सरकार आल्यापासून हिंसाचार उफाळला, हे खरे नाही. काश्मिरात २00८ पासून अस्वस्थता आहे. पाकिस्तानातून दहशतवादी खोऱ्यात येऊन स्थिती आणखी बिघडवत आहेत. केंद्रातील आधीच्या यूपीए सरकारने काश्मीरच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आज स्थिती इतकी चिघळली आहे.’
पाकिस्तानला चर्चेत सहभागी करा
पुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काश्मीरला भेट द्यावी, जम्मू-काश्मीरचा राज्यपाल बदलण्यात यावा आणि समस्येशी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक करावी, असे तीन मुद्दे मेहबुबा यांच्या योजनेत आहेत. या चर्चेत पाकिस्तानलाही सहभागी करून घेण्यात यावे, असाही मेहबुबा यांचा आग्रह आहे. काश्मीर प्रश्नाला भू-राजकीय बाजू आहेत. यामुळे फुटीरवादी गट आणि पाकिस्तानला चर्चेत सहभागी करून घेण्याची सूचना मेहबुबा यांनी केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
काश्मिरींना पाकिस्तान नकोच
काश्मीरमधील लोकही अस्थैर्य, अशांतता, संचारबंदी, हिंसाचार या साऱ्याला कंटाळून गेली आहे. राज्यातील ९५ टक्के लोक या साऱ्याच्या विरोधात असून, केवळ ५ टक्केच लोक गडबड करीत आहेत आणि पाकिस्तान त्या आगीत तेल ओतत आहे.
काश्मीरचा आणि पाकिस्तानचा अजिबात संबंध नाही. काश्मिरी लोकांना पाकमध्ये जाण्याची वा वेगळे होण्याची अजिबात इच्छा नाही, असे त्या म्हणाल्या.
संबंध सुधारण्याची संधी पाकिस्तान वारंवार गमावत आहे. राजनाथ सिंग यांच्याशी बोलण्याचे टाळून पाकने संधी गमावती. त्या आधी मोदी पाकला जाऊन आल्यानंतरही पाकने पठाणकोटवर हल्ला केला.
मोदींकडून आशा आहे...
दहशतवादी शक्तींना फुटीरांचा पाठिंबा आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, ‘असे पूर्वापार घडत आले आहे, पण आता नरेंद्र मोदी सरकारकडे संसदेत दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती बदलण्याची त्यांना पुरेपूर संधी आणि शक्यता आहे. त्यांच्याकडून काश्मीरमध्ये बदल घडून आला नाही, तर मग कधीच काश्मीरची स्थिती सुधारणे शक्य होणार नाही. त्यामुळेच मोदींकडून मला खूप आशा आहे.’
पीडीपी-भाजपा सरकार वाजपेयी यांनी आखलेल्या धोरणानुसार काश्मीर प्रश्नावर काम करीत आहे. काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला सध्याच्या स्थितीत कोणतेच स्थान नाही, असे जनरल परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले होते. हीच भूमिका पाकिस्तानने पुढे चालवावी. - मेहबुबा मुफ्ती