दहशतवाद्यांच्या घरवापसीसाठी लष्कर राबवणार 'हे' स्पेशल ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 04:20 PM2018-06-07T16:20:44+5:302018-06-07T16:20:44+5:30
काश्मीरमधील दहशतवाद्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न
जम्मू-काश्मीर: काश्मीर खोऱ्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु असताना स्थानिक दहशतवादी स्वत:च्या कुटुंबीयांना भेटायला घरी येत असल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दहशतवादी त्यांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी निशस्त्र घरी परतत असल्यानं लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी लष्कराचे अधिकारी स्थानिक दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत आहेत.
दहशतवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा आणि समाजाच्या मूळ प्रवाहात परतावं, यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांशी बातचीत सुरू केली आहे. 'एन्काऊंटरमध्ये मारले जाण्यापेक्षा सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सन्मानानं जगा,' असा संदेश कुटुंबीयांनी दहशतवाद्यांना द्यावा, यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. स्थानिक दहशतवाद्यांनी मूळ प्रवाहात परतावं, यासाठी लष्करानं 'ऑपरेशन ऑल इन' सुरू केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी वाट चुकलेल्या तरुणांना आणखी एक संधी दिली जावी, असा लष्कराचा विचार आहे.
'स्थानिक दहशतवादी तरुण त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी परतत आहेत. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. कुटुंबीयांनी त्यांच्या मुलांची समजूत घालून त्यांना मूळ प्रवाहात आणावं, असं आम्हाला वाटतं. त्यांना त्यांचं अर्धवट राहिलेलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचं असल्यास त्यांना तशी संधीदेखील देण्यात येईल,' अशी माहिती लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दहशतवाद्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आई, वडिल, नातेवाईक, त्यांच्या गावचे सरपंच यांच्याशी संवाद साधला जात आहे. 'एन्काऊंटरमध्ये जीव गमावण्यापेक्षा सर्वसामान्य आयुष्य जगा,' असा संदेश दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे.