भाजपला सत्ता द्या, मागासवर्गीय सीएम घ्या; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 05:24 AM2023-10-28T05:24:28+5:302023-10-28T05:24:56+5:30
तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत.
हैदराबाद : तेलंगणामध्ये भाजप सत्तेवर आल्यास मागासवर्गीय व्यक्तीची मुख्यमंत्रिपदी निवड करू, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. सूर्यापेट येथे शुक्रवारी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केले.
अमित शाह यांनी सांगितले की, भारत राष्ट्र समिती व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी घराणेशाहीला महत्त्व दिले आहे. ते कधीही राज्याचे भले करु शकणार नाहीत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आपला पुत्र के. टी. रामाराव यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा आहे; तर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे सोनिया गांधी यांना वाटते. तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत.
दलित नेत्याला तेलंगणाचा मुख्यमंत्री बनविण्याचे तसेच दलितांना प्रत्येकी तीन एकर जमीन देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात के. चंद्रशेखर राव यांना अपयश आले असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. (वृत्तसंस्था)
काॅंग्रेस याेजना करेल बंद : केसीआर
काॅंग्रेस पुन्हस सत्तेवर आल्यास राज्यातील कल्याणकारी याेजना बंद करेल, याचा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुनरुच्चार केला. पलायर येथील प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, ‘रायतू बंधू’सारखी याेजना जनतेच्या पैशांचा दुरुपयाेग आहे, असे काॅंग्रेसचे नेता उत्तम रेड्डी म्हणतात. ते सत्तेवर आल्यास रायतू बंधू, दलित बंधू याेजना बंद करू. शेतकऱ्यांना ३ तास विज पुरेसी आहे, असेही ते म्हणतात, याकडे राव यांनी लक्ष वेधले.
लवकरच काॅंग्रेसची दुसरी यादी
काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी त्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी बैठक झाली. तेलंगणासाठी काँग्रेसने आपल्या ५५ उमेदवारांची पहिली यादी याआधीच जाहीर केली आहे. आता अन्य उमेदवारांच्या निवडीसाठी पक्षनेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.