‘मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपये द्या’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:11 AM2021-06-29T11:11:46+5:302021-06-29T11:12:12+5:30
पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे.
नवी दिल्ली : कोरोना संकटात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सरकारने १० लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. कोरोना संकट हे नैसर्गिक संकट असल्याचे मोदी सरकार का जाहीर करीत नाही, असा प्रश्नही काँग्रेसने विचारला.
भाजप सरकारने मृतांच्या कुटुंबियांना आतापर्यंत कोणते सहकार्य केले? आणि केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबांना मोबदला दे्ण्यात का मागे आहे? पेट्रोल, डिझेलवर केंद्र सरकारने वसूल केलेला अबकारी कर जनतेची संपत्ती आहे. जर केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबाला या पैशांतील १० टक्के (४० हजार कोटी रूपये) रक्कमही खर्च करू शकत नसेल तर फायदा काय? असे काँग्रेसने म्हटले आहे.
पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे. ही फक्त घटनात्मकच जबाबदारी आहे असे नाही तर नैतिक कर्तव्यही आहे. पक्षाची मागणी होती की, केंद्र सरकारने इतर नैसर्गिक संकटांसारखेच कोविड-१९ लाही नैसर्गिक संकटात समाविष्ट करून मृतांच्या कुटुंबांना १० लाख रूपयांची भरपाई द्यावी, असे वल्लभ म्हणाले.
--------------