न्यायाधीशांना मृत्यूदंड द्या! मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला कोर्टाने तुरुंगात पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 04:01 PM2023-11-01T16:01:40+5:302023-11-01T16:03:40+5:30
शर्माने दंड भरला नाही तर त्याला सात दिवसांचा अधिकचा कारवास भोगावा लागणार आहे.
दिल्लीच्या उच्च न्यायालयाने नरेश शर्मा नावाच्या व्यक्तीला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि दोन हजारांचा दंड सुनावला आहे. त्याने न्यायमूर्तींनाच मृत्यू दंडाची शिक्षा देण्याची मागणी कोर्टात केली होती. यावरून न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि शैलेंद्र कौर यांच्या खंडपीठाने न्यायालयाचा अवमान असल्याचा ठपका ठेवत शिक्षा सुनावली आहे.
शर्माने दंड भरला नाही तर त्याला सात दिवसांचा अधिकचा कारवास भोगावा लागणार आहे. शर्मा यांना लगेचच ताब्यात घ्यावे आणि तिहार तुरुंगात पाठवावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शर्मा यांनी एका न्यायामूर्तींविरोधात अपमान केल्याचा, गुन्हेगारी आणि देशद्रोही निर्णय दिल्याचा आरोप केला होते. तसेच त्यांना मृत्यूदंड देण्यात यावा अशी मागणी केली होती.
यावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी नाराजी जाहीर केली. एक जबाबदार नागरिक या नात्याने त्याने न्यायालयाची प्रतिष्ठा आणि कायद्याची न्यायिक प्रक्रिया सांभाळून आपल्या तक्रारी सुसंस्कृतपणे मांडल्या पाहिजेत, असे म्हटले. कारणे दाखवा नोटीस पाठविल्यानंतर शर्मा यांनी त्यातही अपमानजनक उत्तर दाखल केले आहे. यामुळे त्यांना या कृत्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचे दिसत आहे.
शर्मा यांची सुनावणी इन कॅमेरा घेण्याची मागणी वकिलांनी केली होती. ती न्यायालयाने यात लपविण्यासारखे काही नाही असे सांगत फेटाळली होती. तसेच कोणताही स्थगिती आदेश देण्यास नकार देत शर्मा यांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतू, जर त्यांनी मर्यादेचे उल्लंघन केले तर ते कायदेशीर कारवाईस पात्र असतील असेही सुनावले होते. तरीही शर्मा यांनी अपमानजनक भाषेत उत्तर पाठविले होते.