महिलांना संधी दिल्यास जगाचा जीडीपी २ टक्क्यांनी वाढेल - इव्हांका ट्रम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:24 AM2017-11-29T01:24:59+5:302017-11-29T01:25:29+5:30
महिला उद्योजकांना भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे, त्यांच्यासाठी न्यायसंगत कायदे हवे, असा आग्रह अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व त्यांच्या सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी धरला.
हैदराबाद : महिला उद्योजकांना भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे, त्यांच्यासाठी न्यायसंगत कायदे हवे, असा आग्रह अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व त्यांच्या सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी धरला. औद्योगिक क्षेत्रातील लैंगिक भेदभाव संपवून महिलांना योग्य संधी दिल्यास जगाचा जीडीपी २ टक्क्यांनी वाढेल, असेही इव्हांका यांनी म्हटले.
हैदराबादेत ८व्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत इव्हांका बोलत होत्या. महिला उद्योजकांची संख्या वाढत असली तरी महिलांना उद्योग सुरू करताना, त्याची मालकी मिळविता आणि व्यवसाय वाढविताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, असे इव्हांका यांनी सांगितले.
इव्हांका म्हणाल्या, महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय वाढविणे हे केवळ आपल्या समाजासाठीच नव्हे, तर अर्थव्यवस्थेसाठीही चांगले आहे. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, महिलांना पुरुषांच्या बरोबरीने व्यवसायिक संधी दिल्यास जगाचा जीडीपी २ टक्क्यांनी वाढेल.
३६ वर्षीय इव्हांका व्यावसायिक आणि फॅशन डिझायनर आहेत. जून महिन्यात मोदी यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी इव्हांका यांना उद्योजकता शिखर परिषदेचे निमंत्रण दिले होते. परिषदेत १,५00 महिलांची संख्या जास्त असल्याबद्दल इव्हांका यांनी आनंद व्यक्त केला.
वाढू शकते भारतीय अर्थव्यवस्था
इव्हांका यांनी म्हटले की, भारताने कामगारांमधील लैंगिक भेदभाव संपविल्यास भारतीय अर्थव्यवस्था येत्या तीन वर्षांत १५0 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढू शकते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाºया अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. व्हाईट हाऊसमध्ये भारताचा खरा मित्र आहे.
मोदी यांची प्रशंसा
इव्हांका यांनी पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्थेला भरभराटीला आणण्यासाठी झटणारे मोदी हे लोकशाहीचा दीपस्तंभ आहेत. जगाच्या आशेचे प्रतीक आहेत. एका चहाविक्यापासून ते पंतप्रधानपदांपर्यंत तुम्ही मिळविलेले यश अद्वितीय आहे. महिलांच्या सबलीकरणाशिवाय मानवजातीचा विकास अपूर्ण आहे, अशी मोदी यांची श्रद्धा आहे. त्याबद्दल मला त्याची प्रशंसा करावीसी वाटते.