भेटवस्तू देत त्याने केली पत्नीची 'विदाई'
By admin | Published: August 7, 2015 03:01 PM2015-08-07T15:01:51+5:302015-08-07T16:28:23+5:30
लग्नाच्या तीन वर्षानंतर पत्नीच्या प्रेमसंबंधांची माहिती समजल्यावर उत्तरप्रदेशमध्ये राहणा-या फुलचंद नामक तरुणाने पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ७ - लग्नाच्या तीन वर्षानंतर पत्नीच्या प्रेमसंबंधांची माहिती समजल्यावर उत्तरप्रदेशमध्ये राहणा-या फुलचंद नामक तरुणाने पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले आहे. बॉलीवूडमधील चित्रपटातील कथानक शोभेल अशी ही घटना असली तरी प्रत्यक्षात पत्नीची विदाई करताना फुलचंदच्या चेह-यावरील भाव बघून सर्वांचेच डोळे पाणावले होते.
उत्तरप्रदेशमधील बिकापूर या गावात राहणा-या चंदा नामक तरुणीचे २०१२ मध्ये फुलचंदशी लग्न झाले होते. फुलचंद हा पालीपूरब या गावाचा रहिवासी असून तो कामानिमित्त जालंधरला असतो. चंदाचे लग्नापूर्वी तिच्याच गावात राहणा-या सुरजसोबत प्रेमसंबंध होते. मात्र आईवडिलांच्या दबावापोटी तिने फुलचंदशी लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यांनी फुलचंद जालंधरला निघून गेला. या प्रदीर्घ कालावधीत फुलचंदचे फोनवरुन पत्नी चंदाशी बोलणे होत होते. तर दुसरीकडे सुरजचे नातेवाईकही पालीपूरबमध्ये असल्याने यानिमित्त तोदेखील पालीपूरबला यायचा. सुरजचे नातेवाईक व चंदाचे सासर हे एकाच विभागात असल्याने लग्नानंतरही या दोघांमध्ये भेटीगाठी सुरुच होत्या.
ऑगस्टमध्ये फुलचंद जालंधरवरुन गावी परतल्यावर चंदाने लग्नात दिलेले दागिने, भेटवस्तू या गोष्टी फुलचंदला परत केल्या व त्याच्यासमोर सुरजशी प्रेमसंबंध असल्याची कबुलीही दिली. पत्नीचे हे वाक्य ऐकून फुलचंद सुरुवातीला चिडला. त्याला दुःखही झाले. मात्र काही वेळाने सर्व शांत झाल्यावर फुलचंदने चंदा व सुरजचे लग्न लावून देण्याचा धाडसी निर्णय घेतला. आधी त्याने स्वतःच्या घरच्यांची व नंतर चंदाच्या माहेरच्या मंडळींना या घटनेची माहिती दिली. अखेरीस हे प्रकरण गावाच्या पंचायतीसमोर गेले. फुलचंदने पंचायत प्रमुखांना त्याचे म्हणणे पटवून दिले. चंदाच्या कुटुंबानेही या लग्नाला होकार दिला. शेवटी सुरजच्या कुटुंबाला विचारणा झाली व त्यांनीदेखील या लग्नाला होकार दिला.
पालीपूरब येथील शिवमंदिरात नुकतंच सुरज व चंदाचे लग्न झाले. फुलचंदने लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांसाठी जेवण तर ठेवलेच होते. याशिवाय फुलचंद व त्याच्या कुटुंबाने विदाईच्या वेळी चंदाला भेटवस्तूही दिल्या.