Glanders Disease: राजस्थानमध्ये पसरला भयंकर आजार, कुठलंही औषध नाही, त्यावरील उपचार केवळ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 11:43 PM2022-11-01T23:43:50+5:302022-11-01T23:44:06+5:30
Glanders Disease In Horses: लम्पी व्हायरसचा देशभरामध्ये फैलाव होऊन त्यामुळे हजारो जनावरांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता जनावरांमध्ये पसरणाऱ्या अजून एका आजाराने पशुवैद्यक क्षेत्रासमोर आव्हान उभे केले आहे.
जयपूर - लम्पी व्हायरसचा देशभरामध्ये फैलाव होऊन त्यामुळे हजारो जनावरांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता जनावरांमध्ये पसरणाऱ्या अजून एका आजाराने पशुवैद्यक क्षेत्रासमोर आव्हान उभे केले आहे. घोड्यांमध्ये आढळून येणाऱ्या ग्लेंडर्स नावाच्या आजाराने राजस्थानमध्ये शिरकाव केला असून, त्याच्या संसर्गाचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. हा आजार बहुतांशी घोड्यांमध्ये पसरतो. मात्र घोड्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्या माणसांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. राजस्थानची राजधानी असलेल्या बगरू भागातील एका घोडीला ग्लेंडर्स या आजाराचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
राज्यातील प्रथमश्रेणी पशुरुग्णालय आणि पशुपालन विभाग बगरूचे नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, येथील सिराज खान यांच्या घोडीला ग्लेंडर्स विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तसे रिपोर्ट आल्यानंतर घोडीचे मालक सिराज खान यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पशुपालन विभागाच्या आदेशांनुसार स्थापन झालेल्या कमिटीने घोडीला ठार करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे.
बहुतांशकरून घोड्यांना होणाऱ्या या आजाराला ग्लेंडर म्हटले जाते. ज्या घोड्याला या विषाणूचा संसर्ग होतो, त्याच्यावर कुठलाही उपचार होत नाही. जर घोड्याचा रिपोर्ट ग्लेंडर्स पॉझिटिव्ह आल्यास त्याला (युथेनाइज) ठार मारले जाते. तसेच त्या परिसरातील पाच किलोमीटर परिघातील जनावरांचीही तपासणी होते. तसेच बाधित घोड्याच्या मालकांचीही तपासणी केली जाते. गाढव आणि खेचरांमध्येही या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक असतो.
ग्लेंडर हा विषाणूजन्य आजार आहे. जर एखाद्या घोड्याला त्याचा संसर्ग झाला तर त्याच्या नाकातून पाणी वाहू लागते. तसेच त्याच्या शरीरावर फोड येतात. श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. तसेच ताप आल्याने घोडा सुस्तावतो. हीच या आजाराची लक्षणे आहेत. हा आजारा एका जनावरामधून दुसऱ्या जनावरामध्ये पसरतो. हा आजार सर्वसाधारणपणे घोड्यांमध्येच पसरतो. मात्र या आजारावर अद्यापतरी जगात कुठलंही औषध नाही आहे.