ग्लासगो बॉम्बरचा भाऊ साबील अहमदला अटक, लष्कर- ए- तोयबासाठी लोकांची केली भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 05:33 AM2020-08-31T05:33:59+5:302020-08-31T05:34:58+5:30
सौदी अरेबियात डॉ. अहमद फहाद रुग्णालयात काम करायचा. इंग्लंडमधील स्कॉटलंडमध्ये २००७ मध्ये ग्लासगो विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सहभागी असलेला अॅरोनॉटिकल इंजिनिअर काफील अहमदचा साबील अहमद हा धाकटा भाऊ आहे.
बंगळुरू - वर्ष २००७ मधील ग्लासगो बॉम्बरचा भाऊ डॉ. साबील अहमद या भारतीय नागरिकाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर- ए- तोयबासाठी भारतात लोकांची भरती करण्यात अहमद याचा सहभाग असल्याच्या आरोपावरून तो सौदी अरेबियाच्या कोठडीत होता व तेथून त्याला भारतात पाठविण्यात आले होते.
सौदी अरेबियात डॉ. अहमद फहाद रुग्णालयात काम करायचा. इंग्लंडमधील स्कॉटलंडमध्ये २००७ मध्ये ग्लासगो विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सहभागी असलेला अॅरोनॉटिकल इंजिनिअर काफील अहमदचा साबील अहमद हा धाकटा भाऊ आहे. त्यांचा हल्ल्याचा कट फसला व २ आॅगस्ट रोजी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात तो ठार झाला. अहमद हा त्यावेळी लंडनमध्ये होता.
एनआयएने त्याला नवी दिल्लीत अटक केली. तो सौदी अरेबियात २०१० मध्ये गेला होता. लष्कर- ए- तोयबासाठी लोकांची भरती करण्यात कथित सहभाग असल्याबद्दल अहमद याला स्थानबद्ध केल्यानंतर सौदी अरेबियाने त्याची भारतात पाठवणी केली. २०१२ मध्ये २५ जणांविरुद्ध बंगळुरूत गुन्हा दाखल झाला होता व त्यात अहमद हा एक आरोपी होता. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट आणि लूक आऊट नोटीस काढण्यात आली होती.
स्तंभलेखक प्रताप सिम्हा यांच्यावर हल्ला करण्याचा तो कट होता, असा दावा बंगळुरू पोलिसांनी केला होता. आज सिम्हा हे कर्नाटकमधील म्हैसूर येथून भाजपतर्फे लोकसभेत निवडून गेलेले
आहेत.
याप्रकरणी १७ जणांना अटक झालेली असून, त्यापैकी १४ जणांची त्यांनी शिक्षा भोगल्यानंतर सुटका झालेली आहे.
सौदी अरेबियाने २०१५ मध्ये हैदराबादच्या रहिवाशाला पाठवले होते व त्याला अटक झाल्यानंतर एनआयएने अहमद याची ओळख निश्चित केली. याप्रकरणी एनआयएने २०१५ मध्ये प्रारंभी दाखल केलेल्या आरोपपत्रात साबील अहमद याचा उल्लेख ‘मोटू डॉक्टर’ असा होता.
———————
व्हिसा नियमांचे उल्लंघन, पाकिस्तानी महिला अटकेत
नोएडा (उत्तर प्रदेश) : व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानची नागरिक महिला नौशीन नाझ (३६, कराची) हिला येथे शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती गौतम बुद्धनगर पोलिसांनी रविवारी दिली.
नाझ दिल्लीतील अजमेरीगेट घरात तिच्या पतीसोबत दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राहत होती. त्या दोघांनी २००५ मध्ये लग्न केले. व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करून नाझ नोएडामध्ये आली. ती बसमध्ये असताना शहरातील सेक्टर १४
एमध्ये उड्डाणपुलाखाली बसची तपासणी झाली असताना तिला अटक झाली व तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
नाझ हिला देशात दीर्घ मुदतीच्या वास्तव्यासाठी हा व्हिसा असला तरी तिला दिल्लीबाहेर कुठेही प्रवास करायचा असेल, तर आवश्यक त्या परवानग्या घ्याव्या लागतात.