परदेशी गुंतवणुकीत भारत पाचव्या स्थानी, जपानला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 19:30 IST2018-01-23T18:03:01+5:302018-01-23T19:30:18+5:30
भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत उद्योगस्नेही देश असल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे.

परदेशी गुंतवणुकीत भारत पाचव्या स्थानी, जपानला टाकले मागे
नवी दिल्ली - भारतातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओंचा एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये भारतानं जपानला मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. जगात गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची एक यादी तयार करण्यात आली असून या यादीत अमेरिकेने पहिले स्थान पटकावले आहे. चीन या यादीत दुसऱ्या स्थानी असून जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या तर भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. ‘प्राईसवॉटर हाऊस कुपर्स’ या संस्थेने एक अहवाल तयार केला आहे. जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओंची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत उद्योगस्नेही देश असल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे. जगातील परदेशी गुंतवणुकासाठी फेव्हरेट डेस्टिनेशन कोणते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेत गुंतवणुकीसाठी पुरेशा संधी आहेत, असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी अनेक सीईओंनी पसंती दर्शवली आहे.
दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही मोदींकडून ‘मेक इन इंडिया’चा प्रसार केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणार आहेत. दावोस येथे कालपासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 48 व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली. गेल्या 20 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी या परिषदेला हजर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. दावोसमध्ये पोहोचल्यावर मोदींनी जागतिक कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा केली. भारतातील गुंतवणुकीबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली. भारत हा गुंतवणुकीसाठी पोषक आणि उद्योगस्नेही देश आहे, याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मोदींनी केला.