भारतात भुकेचं संकट गंभीर, हंगर इंडेक्समध्ये झाली घसरण; पाकिस्तानपेक्षाही वाईट परिस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:56 AM2019-10-16T09:56:38+5:302019-10-16T09:56:44+5:30

एकीकडे आर्थिक आघाडीवर देशाची घसरण होत असताना जागतिक भूक सूचकांक (global hunger index) मध्येही देशाची मोठी घसरण झाली आहे.

Global Hunger Index: India's ranking slips to 102 among 117 Countries | भारतात भुकेचं संकट गंभीर, हंगर इंडेक्समध्ये झाली घसरण; पाकिस्तानपेक्षाही वाईट परिस्थिती 

भारतात भुकेचं संकट गंभीर, हंगर इंडेक्समध्ये झाली घसरण; पाकिस्तानपेक्षाही वाईट परिस्थिती 

googlenewsNext

नवी दिल्ली - एकीकडे आर्थिक आघाडीवर देशाची घसरण होत असताना जागतिक भूक सूचकांक (global hunger index) मध्येही देशाची मोठी घसरण झाली आहे. 117 देशांचा समावेश असलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताला 102 वे स्थान मिळाले आहे. या यादीत असलेल्या दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताला शेवटचे स्थान मिळाले आहे. भारताव्यतिरिक्त इतर आशियाई देश या क्रमवारीत 66 ते 94 या क्रमांकांदरम्यान आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या क्रमवारीत पाकिस्तानही भारताच्या पुढे आहे. 

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये समावेश असलेल्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) गटातील देशांचा विचार केल्यास या देशांमध्येही भारत खूप मागे आहे.  2015 मध्ये ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचे स्थान 93 व्या क्रमांकावर होते. त्यावेळी पाकिस्तानचे स्थान भारतापेक्षा खाली होते. मात्र यावेळी पाकिस्तानने भारतापेक्षा प्रगती करत 94 वा क्रमांक पटकावला आहे. 

2014 ते 2018 या काळात एकत्रित करण्यात आलेल्या माहितीवरून ग्लोबल हंगर इंडेक्सची क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. एकत्रित करण्यात आलेल्या माहितीमध्ये विविध देशातील कुपोषित मुलांची संख्या, कमी वजन आणि वयाच्या तुलनेत कमी उंची असलेले पाच वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या आणि पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचा मृत्युदर यांचा समावेश असतो. 

   दरम्यान, या क्रमवारीत नेपाळने खूप चांगली प्रगती केली आहे. तर भारतामुळे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये दक्षिण आशियाची स्थिती आफ्रिकेमधील उपसहारा क्षेत्रापेक्षा वाईत झाली आहे. या अहवालानुसार भारतात 6 ते 23 महिने वयोगटातील केवळ 9.6 टक्के मुलांनाच किमान योग्य आहार उपलब्ध होतो. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात हा आकडा केवळ 6.4 टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते 100 गुण दिले जातात. यामध्ये 0 गुण हे सर्वोत्तम समजले जातात. त्याचा अर्थ देशात भुकेची स्थिती नाही, असा होतो.  तर 10 पेक्षा कमी गुण असणे म्हणजे त्या देशात भुकेची स्थिती फारशी गंभीर नाही असा अर्थ होतो. तर 20 ते 34.9 गुण भुकेचे गंभीर संकट दर्शवतात. 35 ते 49.9 गुण परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे दर्शवतात. तर 50 किंवा त्यापेक्षा अधिक गुण हे भुकेची परिस्थिती भयावह असल्याचे दर्शवतात.  

Web Title: Global Hunger Index: India's ranking slips to 102 among 117 Countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.