जगभरात सात वर्षांमध्ये वाघांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 03:27 PM2022-07-25T15:27:17+5:302022-07-25T15:27:44+5:30
अस्तित्वाला असलेला धोका मात्र अद्यापही कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगभरात गेल्या सात वर्षांमध्ये वाघांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. याबाबत भारत, नेपाळमध्ये उत्तम स्थिती आहे. वाघांची संख्या वाढली असली तरी त्यांच्या अस्तित्वाला असलेला धोका अद्याप कमी झालेला नाही, असा निष्कर्ष इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने केलेल्या एका पाहणीतून काढण्यात आला आहे.
२०१५ साली जगभरात ३२०० वाघ होते. तो आकडा आता ४२०० वर गेला आहे. जगातील ७६ टक्के वाघ दक्षिण आशियामध्ये आढळून येते. भारत व नेपाळमध्ये वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रशियामध्ये वाघांच्या आकडेवारीत फारसा फरक पडलेला नाही.
‘भारतातील वाघांची वाढती संख्या ही चांगली घटना’
वाघविषयक तज्ज्ञ डॉ. जॉन गुडरिच यांनी सांगितले की, भारत, नेपाळ, थायलंडमधील अभयारण्यांमध्ये वाघांची वाढती संख्या ही चांगली बातमी आहे.
मागील दशकांत वाघांच्या संख्येत जशी वाढ झाली तशीच स्थिती येत्या सात-आठ वर्षांतही कायम राहायला हवी.
इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने सध्या वाघाचा समावेश अस्तित्वाला धोका असलेल्या प्राण्यांच्या यादीत केला आहे.
अजूनही लक्ष्य पूर्ण झाले नाही
वाघांच्या घटत्या संख्येबाबत चर्चा करण्यासाठी २०१० साली रशियामध्ये जागतिक वाघ परिषद झाली होती. २०२२पर्यंत जगभरात वाघांचा आकडा ६ हजारांवर नेण्याचे लक्ष्य या परिषदेत ठरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी दुसरी जागतिक वाघ परिषद होणार आहे. त्यात वाघांची संख्या वाढविण्याबाबत आणखी उपाययोजनांवर चर्चा होईल.
जगभरातील वाघांची स्थिती शंभर वर्षांपूर्वी वाघांची संख्या १ लाख होती. ती आता ४२०० इतकी आहे.
nभारतातील मणिपूर,
जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, हिमाचल प्रदेश,
नागालँड येथून वाघाचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती आहे.
nअफगाणिस्तान, अझरबैजान, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, उझबेकिस्तान, तुर्कस्थान, पाकिस्तान यासहित अनेक देशांतून वाघांचे अस्तित्व संपले आहे.