Global Warming : भारताला जीवघेण्या उष्णतेच्या लाटेचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 01:27 PM2018-10-08T13:27:57+5:302018-10-08T13:28:41+5:30
जागतिक तापमानवाढ ही संपूर्ण जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. येत्या काळात या समस्येचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.
मुंबई - जागतिक तापमानवाढ ही संपूर्ण जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. येत्या काळात या समस्येचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता असून, एका अहवालातील माहितीनुसार जर जगाच्या तापमानात दोन डिग्री सेल्शियसने वाढ झाली तर भारताला उष्ण हवेच्या लाटेचा धोका उद्भवू शकतो. 2015 साली भारताला अशाच उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला होता. ज्यामध्ये सुमारे 2500 लोक मृत्युमुखी पडले होते.
या उष्णतेच्या लाटेचा पाकिस्तानातील कराची आणि भारतातील कोलकाता या भारतीय उपखंडामधील शहरांना भारतीय सर्वाधिक फटका बसेल. या दोन्ही शहरात 2015 सारखी स्थिती उद्भवू शकेल, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
जगातील वातावरणात होत असलेल्या बदलांच्या संदर्भात आयपीसीसीचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे. या अहवालामध्ये जागतिक तापमान वाढीच्या भारताला असलेल्या गंभीर धोक्यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. तसेच युनायटेड किंग्डममधील कार्बनब्रिफ या हवामानासंदर्भात माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार मोठ्या शहरांसंदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. या चारही शहरांमधील सरासरी तापमान गेल्या 147 वर्षांमध्ये 1 डिग्रीने वाढल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे.
यावर्षी डिसेंबर महिन्यात वातावरणातील बदलांसंदर्भात पोलंडमध्ये होणाऱ्या बैठकीत या अहवालामधील काही निष्कर्षांवर चर्चा होणार आहे. तसेच वातावरणातील बदल रोखण्यासाठी सरकारांकडून पॅरिस कराराची समीक्षाही करण्यात येईल. जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी एक असल्याने भारतही या बैठकीत महत्त्वाच्या भूमिकेत असेल.
तापमान वाढीबाबत धोक्याचा इशारा देताना या अहवालात 2030 पर्यंत जगाचे सरासरी तापमान 1.5 डिग्रीच्या स्तरावर पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आले आहे. जर याच गतीने तापमान वाढत राहिले तर 2030 ते 2052 या दरम्यान जागतिक तापमान 15. डिग्री सेल्सीयसने वाढू शकते, असे या अहवालाता म्हटले आहे.