वैभव प्रजासत्ताकाचे!

By admin | Published: January 26, 2016 03:24 AM2016-01-26T03:24:08+5:302016-01-26T03:24:08+5:30

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, तर २६ जाने १९५० रोजी राज्यघटना अमलात आणली गेली. हाच दिवस भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो

The glory of the glory! | वैभव प्रजासत्ताकाचे!

वैभव प्रजासत्ताकाचे!

Next

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, तर २६ जाने १९५०  रोजी राज्यघटना अमलात आणली गेली. हाच दिवस भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी रोजी सुरू होणारा हा उत्सव
२९ जानेवारी रोजी ‘बीटिंग द रिट्रिट’ने
संपतो.
> पहिला प्रजासत्ताक सोहळा
२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाउसच्या दरबार हाउसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. देशातील पहिली परेड इंडिया गेट आणि राजपथ यांच्यामध्ये न होता, त्याच्या जवळ असलेल्या निर्वान स्टेडियममध्ये निघाली. त्याला आज ‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्या दिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांंच्या बग्गीतून गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली.
> तोफांची सलामी : प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या तोफांच्या सलामीचीही एक कहाणी आहे. सुरुवातीस ३१ तोफांची सलामी देण्यात येत असे. त्यानंतर ३१ तोफांपासून ती २१ तोफांपर्यंत आली. असे सांगण्यात येते की, पूर्वी म्हणजेच १४ व्या शतकात बंदराला आलेली जहाजे २१ तोफांची सलामी देऊन सर्व कुशलमंगल असल्याचा संकेत देत असत. तोपर्यंत जगाला सौरमंडळाच्या ७ ग्रहांचीच माहिती होती. तेव्हा प्रत्येक ७ व्या दिवशी चंद्राची चाल बदलली जाते, अशी मान्यता होती. तेव्हा ७ च्या गुणोत्तरात तोफांच्या सलामीची प्रथा सुरू झाली. नंतर तोफांंच्या सलामीची इंटरनॅशनल संख्या ठरवण्यात आली. तेव्हापासून ३१ ऐवजी २१ तोफांच्या सलामीची परंपरा सुरू झाली, जी आजपर्यंत चालू आहे.
> वीरता पुरस्कार : १९६0 साली परेडच्या वेळी मंडपाला लागलेली आग एका मुलाने विझवली. तेव्हापाूसन शूर-धाडसी मुलांना २६ जानेवारीला ‘वीरता पुरस्काराने गौरविण्यात येते. पूर्वी या शूर मुलांची हत्तीवरून मिरवणूक काढली जात असे. आता परेडमध्ये हत्ती सहभागी होत नसल्याने ती प्रथा बंद झाली.
> प्रजासत्ताक दिनीचा कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राजपथावरील संचलन. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन, त्यानंतर राष्ट्रगीत आणि अशोक चक्र व कीर्ती चक्र हे सन्मान देण्याचा प्रमुख कार्यक्रम असतो. त्यानंतर राष्ट्रपती संचलनाची पाहणी करून सलामी स्वीकारतात. हे संचलन भारताचे लष्करी, सामर्थ्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान प्रगती अशा विविध क्षेत्रांचे प्रदर्शन करते. संरक्षण मंत्रालय या कार्यक्रमाचे आयोजन करते. हे संचलन राजपथावर पोहोचायला पाच वर्षे लागली. १९५४पर्यंत कधी किंग्ज् कॅम्प, कधी लाल किल्ला, तर कधी रामलीला मैदानात ते होत होते. मात्र, वेळ बदलत असे.
> बीटिंग द रिट्रिट
२९ जानेवारी रोजी मावळणाऱ्या सूर्याच्या साक्षीने होणाऱ्या कार्यक्रमाने ‘प्रजासत्ताक
दिन सोहळा’ अधिकृतरीत्या संपतो. नॉर्थ आणि साउथ ब्लॉकजवळ होणाऱ्या या कार्यक्रमात विविध बँड्सचा समावेश असतो. या तीन दिवसांमध्ये राष्ट्रपती भवन आणि परिसरास दिव्यांची रोषणाई केली जाते.
प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे बोलविण्याची परंपरा १९५० पासूनच आहे. या दिवशी इतर सार्वभौम स्वतंत्र देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले जातात. १९५० साली पहिल्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्णो उपस्थित राहिले होते. जगातील विविध देशांच्या प्रमुखांनी आजवर या कार्यक्रमास हजेरी लावलेली आहे. प्रमुख पाहुणे होण्याचा मान फ्रान्सला पाच वेळा, भूतानला चार वेळा तर रशियाला तीन वेळा मिळाला आहे. शेजारील देश, आफ्रिकेतील देश, तसेच युरोपातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना ही संधी देण्यात आलेली आहे.
> आतापर्यंतचे काही पाहुणे
१९५० : सुकार्णो (राष्ट्रपती इंडोनेशिया)
१९५१ : राजे त्रिभुवन वीर विक्रम शाह ( राजे नेपाळ)
१९५४ : मलिक गुलाम मोहंमद (गव्ह. जन. पाकिस्तान)
१९५५ : मार्शल ये जिनयिंग- (चेअरमन स्टँ. कमिटी चीन)
१९६० : क्लिमेंट वोरोशिलोव (चेअरमन रशियन संघराज्य)
१९६१ : राणा अब्दुल हमिद- (कृषिमंत्री पाकिस्तान)
१९७४ : सिरिमाओ बंदारनायके (पंतप्रधान श्रीलंका)
२००६ : किंग अब्दुल्ला बिन अब्दुल्लाह ( राजे सौदी अरेबिया)
२००७ : व्लादिमिर पुतीन- (राष्ट्राध्यक्ष रशिया)
२०१५ : बराक ओबामा- (राष्ट्राध्यक्ष अमेरिका)
२०१६ : फ्रँकोई ओलांद (राष्ट्राध्यक्ष फ्रान्स)

Web Title: The glory of the glory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.