ज्ञानवापीमध्ये कार्बन डेटिंग नाहीच; सुरक्षेच्या कारणावरून वाराणसी न्यायालयाने याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 06:03 AM2022-10-15T06:03:53+5:302022-10-15T06:04:19+5:30
शिवलिंगाची वैज्ञानिक तपासणी आणि कार्बन डेटिंगची मागणी करणारी हिंदू याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाराणसी : वाराणसी न्यायालयाने शुक्रवारी ज्ञानवापी मशिदीच्या आवारात सापडलेल्या ‘शिवलिंगा’च्या कार्बन डेटिंगची याचिका फेटाळली. जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी शिवलिंग सुरक्षित ठेवावे आणि कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचा हवाला देत शिवलिंगाची वैज्ञानिक तपासणी आणि कार्बन डेटिंगची मागणी करणारी हिंदू याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली.
यासंदर्भात सरकारी वकील राणा संजीव सिंह यांनी माहिती दिली. मंगळवारी हिंदू बाजू आणि मशीद समितीची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने १४ ऑक्टोबर रोजी निकाल देण्याचा निर्णय घेतला होता. वजूखानाजवळील मशिदीच्या परिसरात न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आलेल्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या ‘शिवलिंगा’ची कार्बन डेटिंग करण्याची मागणी पाचपैकी चार हिंदू पक्षांनी केली होती. हा वजूखाना मुस्लीम भाविक नमाज अदा करण्यापूर्वीचे विधी करण्यासाठी वापरतात. मशीद समितीने मात्र कार्बन डेटिंगच्या मागणीला विरोध केला होता.
वजूखान्यात सापडलेल्या शिवलिंगासारख्या रचनेचे वय, लांबी आणि रुंदी शोधण्यासाठी या तपासणीची मागणी करण्यात आली होती. पुरातत्त्व सर्वेक्षणाला (एएसआय) चौकशीचे आदेश देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या महिलांपैकी राखी सिंग वगळता कोर्टात उर्वरित चार महिला सीता साहू, मंजू व्यास, रेखा पाठक आणि लक्ष्मी देवी या सुनावणीदरम्यान उपस्थित होत्या.
तपासामुळे वाद संपेल, हिंदू बाजूचा युक्तिवाद
याचिका दाखल करणाऱ्या महिलांनी सांगितले की, पाहणीदरम्यान मशिदीच्या वजूखान्यातून पाणी काढले असता एक शिवलिंगासारखी मूर्ती दिसली. अशा स्थितीत तिचे नुकसान न करता तिचे शास्त्रीय पद्धतीने संशोधन आवश्यक आहे.
मशीद समितीचा विरोध का?
या प्रकरणात ज्ञानवापी मशीद समितीने कार्बन डेटिंगला विरोध करताना म्हटले होते की, कथित शिवलिंगाच्या वैज्ञानिक तपासणीची गरज नाही. हिंदू पक्षाने आपल्या प्रकरणात ज्ञानवापीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे देव-देवतांची पूजा करण्याची मागणी केली आहे. मग शिवलिंगाच्या चौकशीची मागणी का करताहेत? ज्ञानवापी आयोगाच्या वतीने पुरावे गोळा करण्याची हिंदू बाजूची मागणी आहे. मात्र, दिवाणी प्रक्रिया संहितेत अशी कोणतीही तरतूद नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"