जयललितांविरुद्ध द्रमुक सुप्रीम कोर्टात जाणार
By admin | Published: May 26, 2015 01:43 AM2015-05-26T01:43:09+5:302015-05-26T01:43:09+5:30
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना निर्दोष ठरविल्याविरुद्ध द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई : बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना निर्दोष ठरविल्याविरुद्ध द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक काँग्रेसने मात्र अपील दाखल न करण्याचा सल्ला कर्नाटक सरकारला दिला आहे.
या खटल्यात सहभागी होण्याचा द्रमुकला अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने दोनदा म्हटले आहे. जयललिता प्रकरणात पक्ष निश्चितच अपील दाखल करेल, असे द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी निवेदनात म्हटले. कर्नाटक उच्च न्यायालयाने ११ मे रोजी जयललिता व अन्य तिघांना दोषमुक्त केल्यानंतर कर्नाटकने या प्रकरणात सुप्रीम कोर्टात आव्हान द्यावे यासाठी द्रमुकने दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला आहे.
कर्नाटकमधील काँग्रेसच्या कायदा शाखेने सरकारला जयललिता प्रकरणात आव्हान याचिका दाखल न करण्याचा सल्ला दिला आहे. राज्याची भूमिका प्रशासकीय राहिली असून न्यायालयीन प्रक्रियेशी सरकारचा संबंध नाही. जयललितांना उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविण्याच्या प्रकरणात कर्नाटक राज्य हे पक्षकार नाही, असे कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या कायदा शाखेने निवेदनात म्हटले.