भारतात जाताय, सावध रहा - चीनचा नागरिकांना इशारा
By admin | Published: July 8, 2017 04:36 PM2017-07-08T16:36:33+5:302017-07-08T16:36:33+5:30
भारतात प्रवास करताय, करा... पण सावध रहा असा सल्ला चिनी राजदूतावासानं चिनी प्रवाशांना दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
बिजिंग, दि. 8 - भारतात प्रवास करताय, करा... पण सावध रहा असा सल्ला चिनी राजदूतावासानं चिनी प्रवाशांना दिला आहे. भारत व चीनमध्ये सध्या सिक्कीम सीमेवरील परिस्थितीमुळे तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर या सरकारी सल्ल्याला महत्त्वाचं मानण्यात येत आहे. हा प्रवास करू नये असा अॅलर्ट नाहीये, तर चिनी प्रवाशांनी काळजी घ्यावी असं सांगणारी सूचना अशी मखलाशी चिनी परराष्ट्र खात्याने पीटीआयशी बोलताना केली आहे.
दोन दिवसांपूर्वी चिनी प्रवाशांना ट्रॅव्हेल अॅलर्ट देण्याविषयी सुतोवाच चीनने केले होते. भारतामधली सुरक्षाविषयक स्थिती बघून प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन करण्याचे त्यावेळी म्हटले होते. चिनी गुंतवणूकदारांना हा इशारा आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, हा कुणालाही इशारा नसून केवळ भारतात येणाऱ्या चिनी प्रवाशांनी परिस्थिती बघून सावध रहावे एवढेच आम्हाला सुचवायचे आहे, असे चिनी परराष्ट्र खात्याने नमूद केले आहे.
सीमेनजीक चीन बांधतंय रस्ता
भारत, भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात, त्या डोकलाम भागात सध्या तणावाची स्थिती आहे. भारत चीन दरम्यान 3,488 किलोमीटर लांब सीमा असून त्यातील 220 किलोमीटर लांबीचा भाग सिक्कीमलगत आहे.
भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा सिक्कीममध्ये जिथे मिळते त्या ट्राय जंक्शनवरुन भारताने माघार घ्यावी यासाठी चीनकडून विविध मार्गांनी दबाव आणला जात आहे. पण भारताने आता रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिथे खोदकाम सुरु केले आहे. एका हायडेल प्रोजेक्टपासून 30 किमी अंतरावर हे खोदकाम सुरु आहे. झलोंग येथील जलढाका नदीवर हा हायड्रो इलेक्ट्रीक प्रोजेक्ट आहे. झलोंग भूतानच्या सीमेपासून फार लांब नाहीय.
या भागातून वाहणा-या जलढाका आणि तोर्षा नदी ब्रम्हपुत्रा नदीला जाऊन मिळते. चीनची डोकलाममध्ये रस्ता बांधायची जी योजना आहे ती यशस्वी झाली तर, हा भाग थेट चीनच्या टप्प्यात येईल. रस्ते बांधणीच्या निमित्ताने चीनचा जो इरादा आहे त्यामध्ये चीनला वर्चस्व मिळाले तर सिलीगुडी कॉरिडोर आणि सिलीगुडी शहराची सुरक्षा धोक्यात येईल तसेच चीनी सैन्याला सहज भारतीय हद्दीत घुसखोरी करता येईल.
आणखी वाचा...