गोवा-सिंगापूर नव्हे, तर ओढा लडाख, सिक्कीम, भूतानकडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:44 AM2020-01-01T04:44:26+5:302020-01-01T06:48:32+5:30
गोव्याचे आकर्षण कमी झाल्याचे दिसत असल्याचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. नव्या ठिकाणी पर्यटनाला जात असताना जिथे कमी गर्दी असते, अशा ठिकाणांची निवड करण्यात येत आहे.
- शीतलकुमार कांबळे
एक वेळ होती, जेव्हा रशियन लोक पर्यटनासाठी गोव्यामध्ये येत होते. आता भारतीय रशियाला जात आहेत. रशियाने त्यांच्या देशातील प्रेक्षणीय स्थळांमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. गोव्याचे आकर्षण कमी झाल्याचे दिसत असल्याचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. नव्या ठिकाणी पर्यटनाला जात असताना जिथे कमी गर्दी असते, अशा ठिकाणांची निवड करण्यात येत आहे.
धर्मशाला, पॉँडिचेरी, लेह, लडाख, सिक्कीम, गंगटोक, अरुणाचल प्रदेश, आसाम, भूतान तशी तुलनेने लहान ठिकाणे आहेत. यापूर्वी तिथे वाहतुकीच्या चांगल्या सुविधा नव्हत्या. मागील काही वर्षांपासून रस्त्यांच्या कामात वाढ झाली आहे. एखाद्या लहान ठिकाणी रस्त्याचा वापर करून जाता येते. याचा फायदा भारतातील या कमी वर्दळ असलेल्या ठिकाणांना होत आहे. ज्या प्रकारचे सोंदर्य हे काश्मीरमध्ये आहे, तसेच सौंदर्य गंगटोकमध्ये आहे, तर मग पुन्हा कश्मीरला न जाता गंगटोककडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
काही वर्षांपूर्वी मोजक्या टुरिझम कंपन्यांची एकाधिकारशाही होती. आता ही एकाधिकारशाही मोडीत निघाली आहे. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक पर्यटनाच्या व्यवसायात उतरले आहेत. त्यांच्यामधील स्पर्धेतून पर्यटकांना अधिक चांगली सेवा तीही कमी खर्चामध्ये मिळत आहे. पर्यटकांना सेवा देताना घरगुती जेवण, आदरातिथ्य यांचा जास्त विचार केला जात आहे. तरुणदेखील पर्यटनाचा अभ्यासक्रम शिकून, त्यात नव्या कल्पनांची भर घालत अधिक व्यावसायिक व पर्यटनाभिमुख होत आहेत. चांगल्या सुविधा देणाºया हॉटेलांची संख्या वाढली आहे.
फिरायला जायचं म्हटलं, तर गोवा, सिंगापूर, स्वित्झर्लंड, मनाली हीच नावे आधी तोंडी यायची. पर्यटकांना आता त्याच-त्याच ठिकाणी जाण्याचा कंटाळा आला आहे. त्याच ठिकाणी जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशांमध्ये नवीन ठिकाण पाहता येते, असा विचार भारतीय लोक करत आहेत. त्यामुळे नव्या वर्षात कमी गर्दी असलेल्या लडाख, सिक्कीम, भूतान या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
कोकणामध्ये अनेक छोटी-छोटी पर्यटन स्थळे आहेत. आता ही स्थळेदेखील विकसित झाली आहेत. विशेष म्हणजे, तिथे राहणारे स्थानिक हे घरी आलेल्या पाहुण्यांसारखे आदरातिथ्य करतात. आपल्या वाड्यावस्त्या या फक्त पर्यटकांसाठी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अगदी पाचशे रुपयांमध्ये राहणे आणि नाश्ता यांची सोय केली जाते. खाण्यासाठी अस्सल कोक णी घरगुती पदार्थ दिले जात आहेत. पूर्वी स्वच्छतागृहासारख्या सोई तिथे नव्हत्या़ आता त्याही चांगल्या दर्जाच्या देण्यात येत आहेत. कोकणातील स्थानिकांनी आपल्या येथील नैसर्गिक सौंदर्याचे महत्त्व जाणले असून, परवडेल अशा मोबदल्यात ते सुविधा देत असल्याने भारतीयांनाच काय परदेशी नागरिकांनाही घरगुती पाहुणचार आवडायला लागला आहे.
परदेशी ठिकाणे, नैसर्गिक सौंदर्य असणारी ठिकाणे पाहण्याबरोबरच धार्मिक पर्यटनही मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्याचे वाढलेले जाळे, पर्यटन कंपन्यांमध्ये वाढलेली स्पर्धा यामुळे पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. पर्यटन स्थानांची निवड करताना त्यात नावीन्य काय आहे, हे पाहण्याक डे कल वाढला आहे.
- रवी हलसगीकर, पर्यटक