अमरनाथ दर्शनाला जा आता थेट कारने! यात्रेकरूंसाठी ‘बीआरओ’ने तयार केला रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 07:14 IST2023-11-10T06:19:28+5:302023-11-10T07:14:39+5:30
अमरनाथ हे पर्वताच्या कुशीत दक्षिण काश्मीरमध्ये ३८८८ मीट उंचीवर स्थित आहे.

अमरनाथ दर्शनाला जा आता थेट कारने! यात्रेकरूंसाठी ‘बीआरओ’ने तयार केला रस्ता
श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंसाठी खुशखबर आहे. आता त्यांना थेट अमरनाथ धामपर्यंत मोटारीने जाता येणार आहे. सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) नुकताच अमरनाथला मोटारीने जाता येण्यासारखा रस्ता बांधून पूर्ण केला असून मोटारीने गेलेल्या प्रवाशांच्या पहिला जत्थ्याने नुकतेच अमरनाथ दर्शन घेतले.
अमरनाथ हे पर्वताच्या कुशीत दक्षिण काश्मीरमध्ये ३८८८ मीट उंचीवर स्थित आहे. तेथे पोहोचणे म्हणजे भाविकांची कसोटीच असते. दुमल येथून बालटाल बेस कँप मार्गे हा रस्ता थेट अमरनाथपर्यंत बांधून एक इतिहास रचण्यात आला आहे, असे बीआरओतर्फे सांगण्यात आले. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीर प्रशासनाने या दुहेरी रस्त्याच्या देखरेखीची जबाबादारी बीआरओवर सोपवली होती. त्यानंतर हा रस्ता मोटारीने जाण्यायोग्य दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
थेट अमरनाथपर्यंतचा रस्ता तयार झाल्यामुळे भाविकांची सोय झाली असली तरी पर्यावरणवाद्यांनी मात्र धोक्याचा इशारा दिला आहे. पीडीपीने याला सर्वात मोठा गुन्हा म्हटले आहे.
दरडी कोसळण्याचे प्रकार वाढतील
माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, या रस्त्यामुळे हिमालयातील उतार अस्थिर होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार वाढू शकतात.
सरकारने दाल सरोवर, सोनमर्ग, पहेलगाम आदी परिसरात बांधकामांना पूर्णपणे बंदी घातली आहे. मग अमरनाथ गुंफा परिसरातील पर्यावरण राखण्याची आपली जबाबदारी नाही का?
भाविक ‘ती’ परंपरा कायम ठेवतील...
‘काश्मीरच्या नागरिक शेकडो वर्षांपासून अमरनाथच्या भाविकांना आपल्या खांद्यावर वाहून नेतात. ही परंपरा पुढेही कायम चालू राहील. कदाचित अनेक भाविकांना अमरनाथला कारने जावे वाटणार नाही. ते माता वैष्णोदेवीला जातात त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने अमरनाथ यात्रेला जाणे पसंत करतील आणि स्थानाचे पावित्र्य राखतील’, असा आशावादही ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.