Goa Assembly Election 2022 : 'भाजपने मनोहर पर्रिकरांच्या कुटुंबीयांसोबतही 'युज अँड थ्रो'चं धोरण अवलंबलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 02:39 PM2022-01-20T14:39:44+5:302022-01-20T14:50:03+5:30
भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजीतून तिकीट नाकारल्यामुळे अनेक भाजपविरोधी पक्षांनी भाजपवर टीका केलीय. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण, तसं घडलं नाही
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला कुठून निवडणुकीच्या मैदानात उतरवणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. गोव्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर. भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रिकर यांचं आपमध्ये स्वागत केलंय. तर, भाजपवर जोरदार प्रहार केलाय.
भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजीतून तिकीट नाकारल्यामुळे अनेक भाजपविरोधी पक्षांनी भाजपवर टीका केलीय. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण, तसं घडलं नाही. त्यामुळे भाजपने उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारून योग्य केलं नाही अशी टीका इतर पक्षांनी केली. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी थेट उत्पल पर्रिकर यांना आपचं तिकीट ऑफर केलं आहे. तसेच, भाजपवरही निशाणा साधलाय.
भाजपने वापरा आणि फेकून द्या या धोरणानुसार पर्रिकर कुटुंबीयांचा वापर केला, गोव्यातील लोकांनाही याचे दु:ख आहे. मी नेहमीच मनोहर पर्रिकर यांचा आदर करतो. उत्पल यांचं आम आदमी पक्षात स्वागत आहे, त्यांनी आपच्या तिकीटावर गोव्यातून निवडणूक लढवावी, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलय
शिवसेनेनंही देऊ केली ऑफर
दरम्यान, उत्पल पर्रिकरांना उमेदवारी देण्यात शिवसेना तयार आहे आणि ते जर अपक्ष लढत असतील तर त्यांच्याविरोधात कोणीही उमेदवार देऊ नये, तीच मनोहरभाईंना खरी श्रद्धांजली ठरेल, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. तर, उत्पल पर्रिकरांचा होकार असल्याचा आप त्यांना उमेदवारी देईल, असं गोव्यातील आपचे उपाध्यक्ष म्हणाले होते.