Goa Assembly Election Result 2022: ...आणि फडणवीस गोव्यात बनले किंगमेकर, या गोष्टी पडल्या भाजपाच्या पथ्थ्यावर
By बाळकृष्ण परब | Published: March 12, 2022 03:18 PM2022-03-12T15:18:55+5:302022-03-12T15:24:26+5:30
Goa Assembly Election Result 2022: चुरशीच्या झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली.BJPने २० जागा जिंकत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे यंदाच्या गोव्यातील निवडणुकीत भाजपाचे देवेंद्र फडणवीस किंगमेकर ठरले. आता गोव्यातील भाजपाच्या विजयाची समीक्षा करताना या विजयाची अनेक कारणे समोर येत आहेत.
-बाळकृष्ण परब
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल काल लागले. यामध्ये उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे सर्वाधिक लक्ष लागले होते ते गोव्यातील निकालांकडे. त्याचं कारणही तसंच होतं. राज्यात विरोधी पक्षात असलेला भाजपा गोव्यात सत्तेत होता, तर भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. त्यातच भाजपाचा कट्टर विरोधक बनलेल्या शिवसेनेनेही गोव्यात भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात भाजपाचे प्रभारी असल्याने शिवसेनेच्या विरोधाला अधिकच धार आली होती. यावेळी गोव्यात भाजपा आणि काँग्रेससह मगोप, तृणमूल काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, रिव्होल्युशनरी गोवन्स असे अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने रंगत अधिकच वाढली होती. मात्र या चुरशीच्या निवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली. भाजपाने २० जागा जिंकत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे यंदाच्या गोव्यातील निवडणुकीत भाजपाचे देवेंद्र फडणवीस किंगमेकर ठरले. आता गोव्यातील भाजपाच्या विजयाची समीक्षा करताना या विजयाची अनेक कारणे समोर येत आहेत.
गोव्यातील भाजपाच्या विजयामध्ये सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणून जी बाब समोर आलीय ती म्हणजे गोव्यात विरोधी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली मतविभागणी. यावेळी गोव्यात अनेक पक्ष रिंगणात असल्याने मतदारांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली. गोव्यात भाजपाला सुमारे ३३.३ टक्के मते मिळाली. तर विरोधात असलेल्या काँग्रेसला जेमतेम २३.५ टक्के मते मिळाली आहेत. तर मगोप, आप, तृणमूल काँग्रेस या पक्षांनी १९.४ टक्के एवढी मते मिळवली आहेत. ही मतविभागणी अनेक मतदारसंघात निर्णायक ठरली. एकीकडे विरोधी मतांची फाटाफूट होत असताना दुसरीकडे भाजपाची मते मात्र एकगठ्ठा भाजपासोबत राहिली.
त्यातच यावेळी भाजपाने गोव्यात उमेदवारी देताना इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य दिले. त्यातून इतर पक्षातील काही नेत्यांना भाजपात आणले गेले. भाजपातील काही विद्यमान नेत्यांची तिकिटे कापली गेली. तर उत्पल पर्रिकर यांना पणजीतून उमेदवारी नाकारण्यासारखे कठोर निर्णय घेतले गेले. त्यामुळे गोव्यातील प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस टीकेचे धनी झाले. मात्र पक्षहितासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असे सांगत त्यांनी ही टीका पचवली. मात्र निकालानंतर आता फडणवीसांचा तो निर्णय पक्षहिताच्या आणि निवडणुकीतील विजयाच्या दृष्टीने योग्य असल्याचे दिसून आले आहे.
या सर्वांबरोबरच भाजपाविरोधात लाट असतानाही मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला विरोधी मतं आपल्याकडे खेचण्यात आणि आपणच मुख्य पर्याय आहोत, असं चित्र उभं करण्यात आलेलं अपयशही भाजपाच्या पथ्यावर पडलं आहे. गोव्यामध्ये २०१७ साली १७ जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष नंतर फुटत गेला आणि अखेरीस त्यांच्याकडे केवळ दोन तीन आमदारच उरले. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या बाजूने छुपी लाट असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. अखेरीस काँग्रेसची ही सुमार कामगिरी भाजपाच्या पथ्यावर पडली. एकंदरीत फडणवीसांच्या रणनीतीसोबत स्थानिक परिस्थितीही गोव्यात भाजपाच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण ठरली होती. आता या विजयामुळे भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात फडणवीसांचे वजन वाढेल एवढं निश्चित.