गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात ठोकला १०० कोटींच्या मानहानीचा खटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 00:02 IST2024-12-18T00:01:51+5:302024-12-18T00:02:31+5:30
Defamation Case Against Sanjay Singh : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्याविरोधात १०० कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात ठोकला १०० कोटींच्या मानहानीचा खटला
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्याविरोधात १०० कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी गोव्यामधील एका न्यायालयाने संजय सिंह यांना नोटिस बजावली आहे. गोव्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्य कॅश फॉर जॉब प्रकरणी संजय सिंह यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेमधून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांच्या पत्नीने हे पाऊल उचलले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संजय सिंह यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. कॅश फॉर जॉब प्रकरणाशी माझ्या कुटुंबाचं कुठलंही देणंघेणं नाही आहे, असा दावा प्रमोद सावंत यांनी केला आहे. तसेच सावंत यांनी या प्रकरणी खोटे आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. भाजपा प्रवक्ते गिरिराज पै वर्णे कर यांनी सांगितले की, प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी उत्तर गोव्यातील बिचोलिम डिव्हिजन कोर्टमध्ये संजय सिंह यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यानंतर कोर्टाने संजय सिंह यांना नोटिस बजावली आहे.
सुलक्षणा सावंत यांनी आपल्या तक्रारीमध्ये संजय सिंह यांना या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांबाबत एक माफीनामा प्रकाशित करण्याचे आदेश देण्याची मागणी वकिलांच्या माध्यमातून कोर्टाकडे केली आहे. तसेच आपल्याविरोधात करण्यात आलेले आरोप, अपमानास्पद व्हिडीओ आणि मुलाखली ह्या खोट्या आहेत, हे स्पष्ट करण्यात यावे. त्याबरोबरच या प्रकरणी संजय सिंह यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच संजय सिंह यांना सोशल मीडियावर, व्हॉट्सअॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम, युट्यूब आणि एक्स आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला बदनाम करणारी केलेली विधानं आणि पोस्ट हटवण्याचे आदेश देण्याची मागणी सुलक्षणा सावंत यांनी केली आहे.