Goa Election 2022: गोवा प्रचारात मागे, पण मतदानात पुढे; यंदाही ओलांडणार ८० टक्के?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 07:08 AM2022-02-12T07:08:10+5:302022-02-12T07:08:33+5:30
अवघे ४० आमदारांचे लहान राज्य असलेल्या गोव्यात विधानसभेची निवडणूक होत आहे.
राजेश निस्ताने
पणजी : गोव्यातील ४० विधानसभा मतदारसंघासाठी १४ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. पण कुठेच प्रचाराचा धुराळा उडालेला नाही. राजकारण या विषयावर कुणीच बोलतानाही दिसत नाही. परंतु हेच गोवेकर मतदान मात्र न चुकता करतात. त्यामुळे मतदानाची येथील टक्केवारी ८० च्या पुढेच राहते.
निसर्ग सौंदर्य व पर्यटन हीच गोव्याची ओळख आहे. पर्यटनामुळे येथे आर्थिक उन्नती, रोजगार निर्मिती होते. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय गेली दोन वर्षे डबघाईस आला. परंतु आता देश-विदेशांतील पर्यटक पुन्हा गोव्याकडे वळताना दिसत आहेत. अवघे ४० आमदारांचे लहान राज्य असलेल्या गोव्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग म्हणजे गोवा विधानसभेचा मतदारसंघ, एवढे लहान हे राज्य आहे. प्रत्येक मतदारसंघात सरासरी २७ हजार मतदार आहेत. त्यामुळे सर्वच जण एकमेकांना ओळखतात. उमेदवार मतदारांना आणि मतदार उमेदवारांना प्रत्यक्ष ओळखत असल्याने कुण्या एका मतदाराला ‘होय’ म्हणण्याची रिस्क गोव्यातील चाणाक्ष मतदार घेताना दिसत नाहीत. सर्वच उमेदवारांना ‘आमचे मत तुमचेच’ हे सांगण्याचा प्रयत्न होतो.
तरुणाईची मतदानाला पहिली पसंती
१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. याच दिवशी गोव्यातील आमदारांच्या ४० जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. व्हॅलेंटाईन डे गोव्यात मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो. समुद्र काठ, सर्व बीच फुललेले असतात. गोव्यातील तरुणाई मात्र आधी मतदान, नंतरच व्हॅलेंटाईन डेचे सेलिब्रेशन, अशा मूडमध्ये दिसत आहे.