Goa Exit Poll: गोव्यात वेगवान हालचाली, प्रमोद सावंत दिल्लीत; संध्याकाळी फडणवीसांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:41 PM2022-03-08T14:41:54+5:302022-03-08T14:43:10+5:30
देशात प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये गोव्याचा कल भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याचा दिसून आला आहे
मुंबई - देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आले असून युपीत भाजपचीच सरशी दिसत आहे. तर, महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या गोव्यामध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीचे रण चांगलेच रंगले होते. भाजपा, काँग्रेस आणि मगोप या प्रस्थापित पक्षांसोबत तृणमूल काँग्रेस, आप आणि स्थानिक पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने गोव्यातील विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे, यावेळी गोव्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी गोव्यात चर्चा होती. गोव्यात त्रिशंकू परिस्थिती दिसून येत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला आहेत.
देशात प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये गोव्याचा कल भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याचा दिसून आला आहे. एक दोन अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलनी गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना २०१७ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, प्रमोद सावंत आज तातडीने मोदींच्या भेटीला जात आहेत. 'गोव्यात जास्तीत जास्त जागांसह भाजपचं सरकार स्थापन करणार आहे. पुन्हा एकदा गोव्याची जबाबदारी माझ्याकडेच दिली जोईल. भाजप जे सांगते, ते निश्चितच आचरणात आणते,' असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रमोद सावंत हे आज दिल्लीत पीएम मोदींची भेटीला असून भाजप अध्यक्षांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी मोदींना सांगितल्याचं समजते. विशेष म्हणजे यासंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांचीही ते भेट घेणार आहेत.
Correction: I met with PM Modi today, held poll discussion. We'll form govt with max seats... I feel I'll be given the chance to serve...(as Goa CM) once again. If* BJP has said so (his candidature as CM), it'll definitely happen. BJP practices what it preaches: Pramod Sawant pic.twitter.com/M7bJGvE9DT
— ANI (@ANI) March 8, 2022
भाजपला गोव्यात 20 पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, अनेक एक्झिट पोलची आकडेवारी तशीच सांगत आहे. आम्ही अपक्ष आमदार आणि प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन गोव्यात सरकार स्थापन करू. आम्ही एमजीपीला पाठिंबा मागत आहोत. केंद्रीय नेतृत्व या पक्षांसोबत वाटाघाटी किंवा त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करेल, असेही प्रमोद सावंत यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे.
काय सांगताहेत एक्झिट पोल
गोव्याबाबत टीव्ही नाईन भारतवर्ष-पोलस्ट्रेटने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला १७ ते १९ जा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ११ ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये आपला १-४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना २-७ जागा मिळण्याची शक्यता आहे.
टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार गोव्यामध्ये भाजपाला १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १६ जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष ४ जागा जिंकू शकतो. तर इतर पक्षांना ६ जागा मिळू शकतात.
दरम्यान, गोव्याबाबत इंडिया टीव्ही-ग्राऊंड झीरोने मात्र गोव्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या एक्झिट पोलनुसार गोव्यात भाजपाला १०-ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला २० ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. मगोप आघाडीला ३-५ तर इतरांना १ ते ४ जागा मिळू शकतात