परदेशी महिलेवर अत्याचार करुन हत्या; आठ वर्षांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:16 IST2025-02-17T17:13:28+5:302025-02-17T17:16:38+5:30
गोव्यात आयरिश महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

परदेशी महिलेवर अत्याचार करुन हत्या; आठ वर्षांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
Goa Foreign Tourist Rape Murder Case: गोव्यातील एका परदेशी महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषीला कठोर शिक्षा सुनावली आहे. गोव्यात एका आयरिश-ब्रिटिश महिलेच्या बलात्कार-हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीला बलात्कार-हत्येसाठी २५,००० रुपये आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल १०,००० रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
सोमवारी, स्थानिक रहिवासी विकट भगत याला आयरिश महिलेच्या बलात्कार-हत्या प्रकरणात दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावण्यात आली. आयर्लंडमधील या महिलेच्या सात वर्षे जुन्या बलात्कार-हत्या प्रकरणात विकट भगतला दोषी ठरवण्यात आलं होतं. ही महिला सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात आली होती. शवविच्छेदन अहवालामध्ये ब्रेन हॅमरेज आणि गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आलं होतं. आरोपी विकट भगतला १४ फेब्रुवारी रोजी दोषी ठरवण्यात आले होते. विकट भगतला दोषी ठरवल्यानंतर पीडितेच्या आईने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांचे आभार मानले होते.
गोव्याच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी विकट भगतला शिक्षा सुनावली आहे. विक्रम वर्मा हे पीडितेचे वकील होते. विक्रम वर्मा यांनी सांगितले की, पुरावे नष्ट केल्याबद्दलही दोषीला दोन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगाव्या लागतील, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील प्रत्येक पुरावा अतिशय काळजीपूर्वक गोळा करण्यात आला होता. यानंतर तपास पूर्ण होऊन गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यात पोलिसांना यश आलं.
पीडित महिला २०१७ मध्ये गोव्यात फिरायला आली होती. पीडिता ही आयर्लंडमधील डोनेगल काउंटी शहरातील बनक्राना येथील रहिवासी होती. तिने लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातून शिक्षण घेतले. फेब्रुवारी २०१७ मध्ये ती तिच्या मित्रांसह बॅकपॅकर म्हणून सुट्टीसाठी गोव्यात आली होती. बॅकपॅकर्स हे असे प्रवासी असतात जे मर्यादित बजेटमध्ये हलके सामान घेऊन प्रवास करतात. यावेळी तिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट होता.
१३ मार्च २०१७ च्या रात्री ती पालोलेम बीचजवळ एका पार्टीत गेली होती. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह शेतात आढळून आला. पोलिसांना तिचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासानंतर विकट भगतला अटक करण्यात आली. विकट हा त्याच भागातील रहिवासी होता. त्याच्यावर यापूर्वीच चोरी, मारहाण आणि दरोड्याचे गुन्हे दाखल होते.