गोव्याचे मंत्री मिकी पाशेकोंना ६ महिने कैद
By admin | Published: March 31, 2015 02:25 AM2015-03-31T02:25:50+5:302015-03-31T02:25:50+5:30
वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेले ग्रामीण विकास मंत्री मिकी पाशेको यांच्या सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब
सुशांत कुंकळयेकर, मडगाव (गोवा)
वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेले ग्रामीण विकास मंत्री मिकी पाशेको यांच्या सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला पाशेको यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला व न्या. शिवकीर्ती सिंह यांनी त्यांचा आव्हान अर्ज फेटाळला. परिणामी पाशेको यांना एका आठवड्यात शरण यावे लागेल अथवा सर्वोच्च न्यायालयातच पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल.
पाशेको हे गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा असून सध्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खाते आहे. याआधी प्रतापसिंह राणे सरकारमध्ये कृषीमंत्री असताना १५ जुलै २00६ रोजी पाशेको यांनी वीज अभियंता कपिल नाटेकर यांना कार्यालयात बोलावून थप्पड लगावली होती. या प्रकरणात तब्बल तीन वर्षे कोणतेही आरोपपत्र दाखल झाले नव्हते. आरटीआय कार्यकर्ते अॅड. आयरीश रॉड्रिगीस यांनी गोवा सरकारला कायदेशीर नोटीस बजावल्याने शेवटी त्यांच्यावर २00९ साली आरोपपत्र दाखल झाले होते. २0११ साली मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्याला कामावर असताना मारहाण केल्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते.