मगोतील बंडखोर आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 08:55 PM2019-03-27T20:55:44+5:302019-03-27T20:56:31+5:30
दरम्यान बुधवारी रात्री ११.३० वाजता मगोतून भाजपमध्ये आलेले दीपक पावसकर यांचा शपथविधी होणार आहे. भाजप मंत्रिमंडळात सुदिन ढवळीकर हे सार्वजनिक बांधकाम खाते व वाहतूक खाते सांबाळत होते व उपमुख्यमंत्रीही होते. ढवळीकरांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे
पणजी: गोव्याच्या मंत्रीमंडळातून काढून टाकण्यात आल्यानंतर मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी भाजपला शह देताना लोकसभेच्या दोन्हीही जागा लढविण्याची घोषणा केली आहे. दरम्यान बुधवारी रात्री ११.३० वाजता मगोतून भाजपमध्ये आलेले दीपक पावसकर यांचा शपथविधी होणार आहे. भाजप मंत्रिमंडळात सुदिन ढवळीकर हे सार्वजनिक बांधकाम खाते व वाहतूक खाते सांबाळत होते व उपमुख्यमंत्रीही होते. ढवळीकरांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे.
मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडीत मगो पक्षात फूट पाडून तीन आमदारांच्या या पक्षातील दोन आमदार बाबू आजगावकर व दीपक पावसकर यांना घेऊन सरळ मगो विधीमंडळ पक्षच भाजपमध्ये विलीन करून घेतला. त्यानंतर ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. ढवळीकर यांच्या ऐवजी दीपक पाऊसकर यांना मंत्रीपदाची शपथही देण्यात येणार आहे. या घडामोडी इतक्या गतीने घडल्या की त्या रोखणेही मगो पक्षाच्या आवाक्याबाहेर गेल्या. त्यानंतर मगो पक्षाचे अध्यक्ष सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विश्वास घात असल्याचे सांगून भाजपला अद्दल घडविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत दोन्ही उत्तर गोव्यात व दक्षिण गोव्यात उमेदवार जाहीर केले. उत्तर गोव्यात माजी आमदार नरेश सावळ तर दक्षिण गोव्यात स्वत: सुदिन ढवळीकर निवडणूक लढणार आहेत.
येथे रात्री गाजतात
संपूर्ण सत्ता नाट्य हे मंगळवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडले. उपसभापती मायकल लोबो यांनी मध्यरात्रीच विधानसभेतील सभापती कार्यालय खोलण्याचा आदेश दिला व ते कार्यालयात आले. त्या ठिकाणी मगोतून फुटून आलेले आमदार दीपक पावसकर व पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी उपसभापतीना मगो विधीमंडळ पक्ष भाजपमध्ये विलीन करीत असल्याचे पत्र दिले. यापूर्वीच हे दोन्ही सदस्य मगो पक्षातून फुटण्यास तयार झाले होते. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी मगो विधीमंडळ पक्ष पाठिंब्याचे पत्र देत नाही म्हणून त्यांना फोडण्याचे प्रयत्न भाजपने चालविले होते. परंतु त्यावेळी ढवळीकर हे पत्र द्यायला तयार झाले म्हणून त्यांना फोडण्याचा बेत रद्द करण्यात आला होता आणि मध्यरात्रीच सावंत यांचा शपथविधी झाला होता. आता मगोचे विलीनीकरणही मध्यरात्रीच झाले व शपथविधीही रात्री ११.३० वाजल्यानंतरच होणार आहे.