पासपोर्ट कमी काळात देण्यात गोवा अव्वल !
By admin | Published: July 28, 2016 12:50 AM2016-07-28T00:50:14+5:302016-07-28T00:50:14+5:30
पासपोर्ट देण्यात गोवा आणि पंजाबमधील जालंधरने तत्परता दाखवत ठरवून दिलेल्या २१ दिवसांच्या वेळेपूर्वी काम पूर्ण केले, तर महाराष्ट्रातील ठाणे येथील पोलिसांनी व्हेरिफिकेशनचे काम
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
पासपोर्ट देण्यात गोवा आणि पंजाबमधील जालंधरने तत्परता दाखवत ठरवून दिलेल्या २१ दिवसांच्या वेळेपूर्वी काम पूर्ण केले, तर महाराष्ट्रातील ठाणे येथील पोलिसांनी व्हेरिफिकेशनचे काम करण्यासाठी ६१ दिवसांचा वेळ घेतला. परिणामी, केवळ ९ टक्केच अर्जदारांचे काम पूर्ण होऊ शकले.
‘लोकमत’च्या हाती लागलेल्या तपशिलानुसार, महाराष्ट्रातील केवळ ठाणेच नव्हे, तर इतरही महत्त्वाच्या शहरांनी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी खूपच वेळ घेतलेला आहे. २०१५-१६ दरम्यान, पुणे पोलिसांनी यासाठी ६५ दिवसांचा वेळ घेतला व केवळ १८ टक्के अर्जांची पूर्तता केली. नागपुरातही फारशी वेगळी स्थिती नव्हती. तेथे पोलिसांनी ४४ दिवस घेतले व केवळ २२ टक्केच अर्जांची पूर्तता केली. मुंबईत त्या तुलनेत थोडी बरी स्थिती आहे. तेथे पोलिसांनी २६ दिवसांत आपले काम पूर्ण केले व ६९ टक्के पासपोर्टची मागणी पूर्ण होऊ शकली. २०१३-१४ मध्ये यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल ७४ दिवसांचा वेळ घेतला व केवळ ३ टक्केच अर्जदारांचे काम पूर्ण झाले. २०१४-१५ मध्ये कामगिरी थोडीशी सुधारत २८ टक्के अर्जदारांचे काम ६० दिवसांत पूर्ण झाले. २०१५-१६ मध्ये मात्र कामगिरी सुधारत, मुंबईने ६९ टक्के अर्जांची पूर्तता केली.
सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सांगण्यानंतर राज्य सरकारनेही याबाबत कमालीची गती घेतली. गोव्याने तर २०१५-१६ मध्ये अर्ज २१ दिवसांऐवजी केवळ १२ दिवसांतच पूर्णत्वाला नेले. जालंधरनेही याबाबत गतीने काम करताना १५ दिवसांत अर्जांची पूर्तता केली.
गुवाहाटी (६ टक्के), श्रीनगर (१ टक्के) आणि जम्मू (२ टक्के) यांनी पासपोर्ट देण्याबाबतच्या यादीत तळ गाठला. मेट्रोंमध्ये कोलकत्याने २०१५-१६ मध्ये २० टक्क्यांची सर्वांत वाईट कामगिरी केली. पाटण्यानेही कोलकात्याची बरोबरी केली. हैदराबादने ९७ टक्के, दिल्लीने ९३ टक्के, चेन्नईने ६७ टक्के, लखनऊने ६० टक्के, तर बंगळुरूने ५० टक्के कामगिरी केली.
कामगिरी सुधारली
देशाने पासपोर्ट अर्जांची पूर्तता करण्याची कामगिरी २०१५-१६ मध्ये ६४ टक्क्यांपर्यंत सुधारून सरासरी ३२ दिवसांत हे काम पूर्णत्वास नेले. ८६.४० लाख या संख्येच्या अर्जदारांना पासपोर्ट देण्यात आले. २०१३-१४ मध्ये तब्बल ६५.३७ लाख जणांना पासपोर्ट देण्यात आले. त्यावर्षी सरासरी ४७ दिवसांचा कालावधी लागला आणि प्रमाण होते ३९ टक्के.