तीर्थस्थळांचे कचरा व्यवस्थापन कसोशीने करण्याचा निर्धार
By admin | Published: October 29, 2015 10:07 PM2015-10-29T22:07:42+5:302015-10-29T22:07:42+5:30
भारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
भारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच, प्रमुख तीर्थस्थळे स्वच्छ व सुंदर बनवण्याची मोहीम केंद्रीय पर्यटन, तसेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने हाती घेतली आहे. तीर्थस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रचलित नियमावलीत सुधारणा करण्याबरोबरच राज्य सरकारांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे केंद्राने ठरवले आहे.
हिंदू देवालयात खरी समस्या देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या फुला- पानांसह पूजा साहित्यातून गोळा होणाऱ्या निर्माल्याच्या विल्हेवाटीची आहे. भाविकांच्या धार्मिक भावना न दुखावता या निर्माल्याची विल्हेवाट योग्यप्रकारे कशी लावता येईल, यावर व्यापक विचारविनिमय सध्या सुरू आहे.
प्लास्टिकवर सर्रास बंदी घालण्याऐवजी राज्य सरकारच्या सहकार्याने तीर्थस्थळांवर प्लास्टिक उत्पादनांचे वैज्ञानिक पद्धतीने रिसायकलिंग करण्याची जबाबदारी वितरकांवर सोपवण्याचे कडक निर्बंधही लवकरच घालण्यात येणार आहेत.
तीर्थस्थळांवर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे, यासंबंधी राज्य सरकारांकडूनही सूचना मागवण्यात आल्या आहेत. राज्यांनी अनेक चांगले प्रस्तावही पाठवले आहेत. या कचरा व्यवस्थापनात मुख्य भूमिका नगरपालिका, महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना वठवावी लागणार आहे.
देवालयातल्या जलाभिषेकाचे पाणी, तेल, तूप, दूध, पंचामृत, नैवेद्यात वाहिलेली फळे, इत्यादी गोष्टी अनेक ठिकाणी गटाराद्वारे गंगेच्या प्रवाहात सोडल्या जातात. नव्या नियमांनुसार तीर्थस्थळाच्या गावात सांडपाण्याचे नाले, गटारी यांचे योग्य प्रकारे निस्सारण (रिसायकलिंग) केल्यानंतरच हे पाणी नद्यांमधे सोडता येईल. त्याच्या कठोर प्रबंधनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल.