गोव्याची धुरा पर्रीकरांकडे!
By Admin | Published: March 15, 2017 04:36 AM2017-03-15T04:36:50+5:302017-03-15T04:36:50+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी चौथ्यांदा शपथ घेतली. पर्रीकर यांच्याव्यतिरिक्त आणखी नऊ मंत्र्यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
सद्गुरू पाटील, पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी चौथ्यांदा शपथ घेतली. पर्रीकर यांच्याव्यतिरिक्त आणखी नऊ मंत्र्यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.
राजभवनवर सायंकाळी शपथविधी सोहळा झाला. पर्रीकर यांनी कोकणीतून शपथ घेतली. मुख्यमंत्री शब्दाऐवजी मंत्री म्हणून शपथ घेत आहे, असा त्यांच्याकडून चुकून उल्लेख झाला. त्यामुळे त्यांनी पुन्हा शपथ घेतली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर, बाबू आजगावकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, विनोद पालयेकर, जयेश साळगावकर व भाजपाचे फ्रान्सिस डिसोझा, पांडुरंग मडकईकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे, गोविंद गावडे यांनीही शपथ घेतली.
प्रादेशिक पक्षांचाच पुढाकार - पर्रीकर
प्रादेशिक पक्षांनीच पुढाकार घेऊन हे सरकार स्थापन केले आहे. गुरुवारी आम्ही बहुमत सिद्ध करू. काँग्रेसला स्वत:च्या १७ आमदारांना बसमधून राजभवनवर आणावे लागले. जर ते स्वतंत्र कारमधून गेले असते, तर एखादी कार मध्येच गायब झाली असती.
- मनोहर पर्रीकर, नवनियुक्त मुख्यमंत्री