अमृताप्रमाणे घेतला जातोय बकरीच्या दूधाचा शोध; १६०० रुपये मोजूनही मिळेना; पण झालंय तरी काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 02:35 PM2021-09-22T14:35:20+5:302021-09-22T14:37:31+5:30
बकरीचं दूध विकणाऱ्यांना अच्छे दिन; ५० रुपयांचं दूध विकलं जातंय १६०० रुपयांना
गुरुग्राम: हरयाणात अचानक बकरीच्या दुधाची मागणी वाढली आहे. गुरुग्राममध्ये आधी बकरीचं दूध ५० ते ६० रुपये लिटर दरानं विकलं जायचं. आता त्याचा दर १६०० रुपये लिटरवर जाऊन पोहोचला आहे. मात्र तरीही बकरीचं दूध उपलब्ध होत नाहीए. तापाची साथ आल्यानं आणि प्लेटलेट्स घटल्यानं लोक बकरीचं दूध शोधत आहेत. बकरीच्या दूधानं प्लेटलेट्स वाढतात. त्यामुळे सध्या बकरीच्या दूधाला वाढती मागणी आहे.
बकरीच्या दूधासाठी लोकांची शोधाशोध सुरू आहे. बकरीच्या दुधामुळे प्लेटलेट्स वाढतात, असं आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचं ऍलोपॅथीचे डॉक्टर सांगतात. जिल्हा रुग्णालयातल्या ओपीडीत दररोज ८०० रुग्ण येतात. यातले ७० टक्के रुग्णांना ताप आहे. संपूर्ण शहरातील रुग्ण येणाऱ्या रुग्णालयात केवळ २ डॉक्टर आहेत. त्यामुळे अनेक जण घरगुती उपचारांचा आधार घेत आहेत.
कोल्ड ड्रिंकच्या एका बाटलीची किंमत 36 लाख रुपये! डिस्काउंटच्या नादात फसला अन्...
तापाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कित्येक जण घरगुती उपचार घेत आहेत. बकरीचं दूध आणि पपईच्या पानांच्या आधारे प्लेटलेट्स वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्लेटलेट्स कमी असलेले रुग्ण बकरीच्या दुधाचा शोध घेत आहेत. याशिवाय पपईच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या गोळ्यांनादेखील मोठी मागणी आहे.
सर्वसामान्यपणे बकरीच्या दुधाची किंमत ५० ते ६० रुपये लिटर असते. मात्र मागणी वाढल्यानं किंमत वाढली असल्याचं सेक्टर १२ मध्ये राहत असलेल्या अरविंद यांनी सांगितलं. 'माझ्या बहिणीला डेंग्यू झाला होता. त्यामुळे प्लेटलेट्स घटल्या. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी बकरीचं दूध खरेदी केलं. त्यासाठी १६०० रुपये मोजले,' असं त्यांनी सांगितलं. शहरात मोजक्या लोकांकडे बकऱ्या आहेत. त्यामुळे दुधासाठी ग्रामीण भागावर अवलंबून राहावं लागत असल्याचं ते म्हणाले.