कॉन्डमची कहाणी... माहीत नसलेला इतिहास, हजारो वर्षांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 02:00 PM2018-07-28T14:00:38+5:302018-07-30T07:52:49+5:30

आज उपलब्ध असणाऱ्या कॉन्डम्सचा शोध लागण्यापूर्वी मनुष्याने गर्भनिरोधासाठी व सुरक्षित लैंगिक संबंधासाठी अनेक वर्षे संशोधन केलेले आहे.

From the goat's intestine to the latex, after many trials man discovered today's condom | कॉन्डमची कहाणी... माहीत नसलेला इतिहास, हजारो वर्षांचा प्रवास

कॉन्डमची कहाणी... माहीत नसलेला इतिहास, हजारो वर्षांचा प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देशेळी, मेंढीसारख्या प्राण्यांच्या आतड्यापासून रेशमी कापडापर्यंत सर्व प्रकार वापरून कॉन्डम तयार करण्याचा प्रयत्न माणसाने केला आहे.इसवी सनाच्या 11 हजार वर्षे आधी मनुष्याने कॉन्डम वापरल्याचे फ्रान्समधील गुहेतील भित्तीचित्रांवरून स्पष्ट झाले आहे.

मुंबई - कॉन्डम.... आजच्या काळात गर्भनिरोधक म्हणून आणि सुरक्षित शारीरिक संबंधासाठी वापरली जाणारी वस्तू. हा शब्द चारचौघांत उच्चारणंही काही वर्षांपूर्वीपर्यंत असभ्यपणाचं मानलं जायचं. पण आज टीव्हीवरही कॉन्डमच्या जाहिराती केल्या जातात. कॉन्डम बाजारात सहज उपलब्ध होऊ लागलेत. या वस्तूचा त्याचा इतिहास आणि आजवरचा प्रवास मोठा रंजक आहे. खरं तर, गर्भनिरोधासाठी कोणतीही वस्तू वापरणं हे अनेक धर्मांमध्ये निषिद्ध मानलं गेलंय. मूल होणं ही दैवी देणगी आहे आणि त्या प्रक्रियेत अडथळा आणणं पाप आहे, अशी समजूत अनेक वर्षं होती.

तरीही, कॉन्डमचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. हो! कॉन्डमसारखी सुरक्षित सेक्ससाठी वापरली जाणारी वस्तू मनुष्य आदिम काळापासून वापरत आला आहे. सुमारे 13 हजार वर्षांपूर्वी माणसाने शरीरसंबंध ठेवताना कॉन्डम वापरल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. फ्रान्समधील इसवी सनाच्या 11 हजार वर्षे आधी मनुष्याने कॉन्डम वापरल्याचे गुहेतील भित्तीचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. अत्यंत ओबडधोबड चित्रांमध्ये पुरुषांनी 'प्रोटेक्शन' म्हणून प्राण्यांची त्वचा वापरल्याचे आढळले आहे. अर्थात त्या काळामध्ये सुरक्षित शरीरसंबंधासाठी ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्यांचाच वापर करणे तेव्हाच्या मानवाला क्रमप्राप्त होते.

(मध्ययुगात अशाप्रकारचे कॉन्डम्स वापरले गेले)
इजिप्त आणि ग्रीस या देशांच्या संस्कृतीची वर्णनं करणाऱ्या पुराणांमध्येही सुरक्षित शरीरसंबंधांसाठी माणसाने प्रयत्न केल्याचे पुरावे आहेत. इजिप्तमध्ये लोकांनी आपल्या गुप्तांगांचे सूर्यप्रकाशापासून रक्षण करण्यासाठी लंगोट वापरण्यास सुरुवात केली होती. तसेच काही शास्त्रज्ञांनी इजिप्तमधील पुरुष शरीरसंबंधांच्यावेळेस लिनन कापडाचे पातळ आवरण त्यांच्या गुप्तांगांवर लावत अशी शक्यता व्यक्त केली आहे. यानंतर कॉन्डमसाठी महत्त्वाचा प्रयोग झाला तो प्राण्यांचा ब्लॅडर वापरुन. ब्लॅडर म्हणजे मूत्राशय. मनुष्य आणि काही प्राण्यांमध्ये हे मूत्राशय म्हणजे मूत्राच्या पिशव्या असतात. मृत प्राण्यांचे मूत्राशय स्वच्छ करुन, वाळवून त्याचा कॉन्डमसारखा वापर मनुष्याने केल्याचे ग्रीकमध्ये सापडलेल्या पुराव्यामुळे समजले आहे. प्राचीन रोमन साम्राज्यातही ब्लॅडरचा वापर सुरु राहिला. डुकराच्या ब्लॅडरला फुग्यासारखे फुगवून तर फूटबॉलही बनवले जात असत. त्याचप्रमाणे इतरही अनेक वस्तू तयार केले जात असत. 

अशाप्रकारे प्रयोग सुरु असताना कॉन्डमच्या प्रगतीने सर्वात महत्त्वाची पावलं टाकली ती 15 व्या शतकात व त्यानंतर. युरोपमध्ये गर्भनिरोधासाठी व सुरक्षित संबंधांसाठी काहीतरी उपलब्ध असावे अशी निकड निर्माण झाली. चीन आणि जपानमध्येही या कॉन्डमवर प्रयोग सुरु झाले. आशियामध्ये त्यावेळेस 'ग्लान्स कॉन्डम' वापरण्यास सुरुवात झाली. ग्लान्स कॉन्डम म्हणजे शिश्नाच्या केवळ वरच्या टोकाचे संरक्षण यामध्ये होत असे. शिश्नाचे वरचे टोक रेशिम, जनावरांचे शिंग आणि कासवाच्या पाठीचे कवच यांसारख्या वस्तूंनी केले जाऊ लागले.


(गॅब्रिएल फॅलोपिओ यांनी सिफिलस रोखण्यासाठी एक कॉन्डम तयार केला होता)

गुप्तरोगांमुळे कॉन्डम संशोधनाला गती आणि इटालियन गिफ्ट
16 व्या शतकामध्ये एका गुप्तरोगामुळे युरोपमध्ये खळबळ माजली. हा रोग होता "सिफिलस" म्हणजे आपण ज्याला गर्मी या नावाने ओळखतो तो रोग. या रोगाला फ्रेंच रोग असेही म्हटले जाई. इटालियन वैद्यकशास्त्रज्ञ गॅब्रिएल फॅलोपिओ यांनी सिफिलसला आळा रोखण्यासाठी कॉन्डमवर संशोधन केले. एका विशिष्ट रसायनांमध्ये लिनन कापडाचा तुकडा बुडवून तो शिश्नावर ठेवला जाई आणि एका रिबनने एखाद्या भेटवस्तूला बांधावे तसा तो शिश्नावर बांधला जाई. हा प्रयोग फॅलोपिओने 1000 रुग्णांवर केल्यानंतर त्यांचा सिफिलसपासून बचाव झाल्याचे लक्षात आले. मात्र धार्मिक क्षेत्रातील लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्यावर त्याचा वापर कमी झाला. असा विरोध सर्वत्र होत असला तरी युरोप आणि आशियामध्ये 18 व्या शतकापर्यंत शेळीच्या आतड्याचा कॉन्डमसारखा वापर होत राहिला. त्याचप्रमाणे ते उपलब्धही होते.

(चार्ल्स गुडइयर यांनी रबराच्या व्हल्कनायजेशनचा शोध लावला आणि कॉन्डमसंशोधनात क्रांती झाली)

रबराने केली क्रांती
19 व्या शतकातही सिफिलस रोगाचा युरोपात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. तो रोखण्यासाठी चांगल्या प्रकारचे कॉन्डम असावेत अशी मागणीही होत होती. 1839 साली चार्ल्स गुडइयर यांनी रबराचे व्हल्कनायजेशन शोधले आणि 1855 साली पहिला रबराचा कॉन्डम तयार झाला. त्यानंतर रबरी क़न्डमवर वेगाने संशोदन होत गेले. कॉन्डमची तपासणी करण्यासाठी पूर्वी पेट्रोलसारखे इंधन किंवा बेन्झीन वापरले जाई मात्र त्यामुळे आग लागण्यासारख्या घटना प्रयोगाच्यावेळेस होऊ लागल्या. त्यानंतर पाण्याचा वापर करुन रबराची तपासणी होऊ लागली. पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिका आणि इंग्लंडने आपल्या सैनिकांना कॉन्डम्स न दिल्यामुळे युद्धानंतर 4 लाख सिफिलस व गनोरियाचे रुग्ण आढळून आले.

(कॉन्डमची आजच्या काळातील अत्याधुनिक फॅक्टरी)
1957 साली कॉन्डम्समध्ये आणखी संशोधन झाले. ल्युब्रिकेशनसह कॉन्डम्स यावर्षी तयार करणे सुरु झाले. त्यानंतर 1980 च्या दशकानंतर एड्सचा प्रसार झाल्यावर तो रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणून कॉन्डम्सचाच वापर झाला. आज बाजारात मिळणाऱ्या कॉन्डम्ससाठी मनुष्याने गेली अनेक हजार वर्षे संशोधन केले आहे.

Web Title: From the goat's intestine to the latex, after many trials man discovered today's condom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.