गोदा कोपली!
By admin | Published: September 27, 2016 01:53 AM2016-09-27T01:53:20+5:302016-09-27T01:53:20+5:30
गोदावरीच्या पुराचा धोका असल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी करीमनगर, वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सोमवारी सूचना दिल्या आहेत.
हैदराबाद : गोदावरीच्या पुराचा धोका असल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी करीमनगर, वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सोमवारी सूचना दिल्या आहेत.
वरंगळ जिल्ह्यातील रामण्णागुदम आणि खम्मम जिल्ह्यातील भद्राचलम या पूरप्रवण भागांवर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील समपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा आणि संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यानुसार पावले उचलावीत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
पूरस्थितीमुळे करीमनगर जिल्ह्यातील १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राव यांनी करीमनगर
जिल्ह्याला भेट देऊन मध्य मण्यार धरण आणि पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. करीमनगर जिल्ह्यातील बांधकाम सुरू असलेले मध्य मण्यार धरण भरून वाहू लागले असून त्याची पाळू काही ठिकाणी फुटल्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोदावरी आणि तिच्या उपनद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वारंगल आणि खम्मम जिल्ह्याचे पालकमंत्री, तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
गोदावरी नदी कोपल्यामुळे त्यांनी वारंगल जिल्हा प्रशासनाला अतिसतर्क राहण्याची सूचना केली. गोदावरीची पाणीपातळी वाढत असल्यामुळे नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सावध केले पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. खम्मन जिल्ह्यातील भद्राचलम येथे नदी धोक्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. राजधानी हैदराबादने १९०८ नंतर प्रथमच पूरस्थिती अनुभवली.
आम्ही वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यात पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहोत. नदीकाठावरील गावांत पोलीस ठेवले असून, गरज भासल्यास तातडीने नदीकाठावरील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. (वृत्तसंस्था)
कोणत्याही स्थितीसाठी सज्ज राहा
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात थांबून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासह मदत आणि पुनर्वसन कार्याची देखरेख करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सखल भागातील लोकांना वेळीच सुरक्षितस्थळी हलविले जाईल याची काळजी घ्या, असेही त्यांनी मंत्र्यांना सांगितले.
ऊर्ध्व मण्यार प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मध्य मण्यार धरण अडचणीत आले. धरणाची पाळू १३० मीटरपर्यंत फुटली आहे.
तथापि, पुराचे आणखीही लोंढे आले
तरी धोका नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पाऊस आणि पुराच्या दृष्टिकोनातून कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहा आणि माणसे आणि गुरांना वाचविण्यास प्राधान्य द्या, असे आदेश राव यांनी अधिकाऱ्यांना दिले.