स्फोटानंतर गोडाऊन कोसळले; गुजरातमध्ये 4 कामगारांचा मृत्यू
By हेमंत बावकर | Published: November 4, 2020 03:38 PM2020-11-04T15:38:26+5:302020-11-04T15:39:10+5:30
Gujarat News: पिराना-पिपळज रोडवरील इमारतीला आग लागली होती. यामुळे तिथे स्फोट झाला. या इमारतीत एक गोडाऊनही होते.
गुजरातमध्ये आज एका गोडाऊनमध्ये मोठा स्फोट झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाच्या धक्क्याने गोडाऊनमधील माल व भिंत अंगावर कोसळून जवळपास 12 जण त्याखाली दबले गेले होते. यापैकी जखमी असलेल्या 8 जणांना एलजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गोडाऊनमध्ये स्फोट होऊन ते कोसळल्याचे समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोडाऊनमधील माल आणी मलबा बाजुला करून 12 जणांना बाहेर काढले. यापैकी 4 जण गंभीर जखमी होते. तर 8 जण जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी जयेश खादिया यांनी सांगितले.
पिराना-पिपळज रोडवरील इमारतीला आग लागली होती. यामुळे तिथे स्फोट झाला. या इमारतीत एक गोडाऊनही होते. हॉस्पिटलने सांगितले की, 12 पैकी चार जणांचा वाटेतच मृत्यू झाला होता. उरलेल्या 8 जखमींवर उपचार सुरु आहेत.