पंतप्रधान मोदी हे भारताला मिळालेले 'गॉड्स गिफ्ट' - व्यंकय्या नायडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2016 08:52 AM2016-03-21T08:52:27+5:302016-03-21T09:00:53+5:30
पंतप्रधान मोदी म्हणजे भारताला मिळालेली दैवी देणगी (गिफ्ट) आहे, अशा शब्दांत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी मोदींचे कौतुक केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यानंतर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करत ' मोदी म्हणजे भारताला मिळालेली दैवी देणगी (गिफ्ट) आहे' असे म्हटले आहे. एवढचं नव्हे तर ' मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत' असेही ते म्हणाले. दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नायडू बोलत होते.
' आज जगभरात भारताची एक ओळख बनली असून भारतीयांना सन्मान मिळत आहे, त्यामागचे कारण आहेत पंतप्रधान मोदी...! त्यांना प्रत्येक क्षेत्रात अडचणींचा, आव्हानांचा सामना करावा लागला आहे, पण त्यांनी सर्वांशी लढा दिला आणि ते पुढे जात राहिले. मोदी जगभरातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक असून ते भारताला समृद्ध आणि मजबूत राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहेत' असे नायडू यांनी नमूद केले.
नायडू यांच्या या विधानाबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नकार दिला. ' मी व्यंकय्याजींचे भाषण ऐकले नाही, त्यामुळे ते काय बोलले हे मला माहीत नाही' असे राजनाथ सिंग यांनी म्हटले.
दरम्यान यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींचे कौतुक करत त्यांना 'गॉड्स गिफ्ट' म्हटले होते. पंतप्रधान मोदींकडे देशासाठी अनेक चांगल्या योजना असून त्यांची योग्यरितीने अमलबजावणी करण्याची दांडगी इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे. ते जगात जिथे कुठेही जातात, तेथील लोक मोदी, मोदी असा त्यांच्या नावाचा गजर करतात. मोदी म्हणजे देवाने भारताला दिलेली भेट आहे. २०२२ पर्यंत ते भारताला विश्वगुरू बनवतील' असा विश्वासही चौहान यांनी व्यक्त केला होता.