'महात्मा गांधींची हत्या गोडसेनेच केली, अज्ञाताने नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 01:52 PM2018-01-08T13:52:04+5:302018-01-08T15:31:28+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा पुन्हा एकदा नव्याने तपास होणार नसल्याचे एमीकस क्युरींनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा पुन्हा एकदा नव्याने तपास होणार नसल्याचे एमीकस क्युरींनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायलयानं माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची एमीकस क्युरी म्हणून नियूक्ती केली होती. शरण यांनी गांधी हत्याकांडाशी निगडीत विविध दस्तऐवजांचा तपास केला आणि गांधीच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास करण्याची गरज नसल्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सुमारे चार हजार पानांची तपासणी करुन हा अहवाल सादर कऱण्यात आला आहे.
मुंबईच्या ‘अभिनव भारत’चे ट्रस्टी डॉ. पंकज फडणीस यांनी ही याचिका केली होती. यात असा दावा केला आहे की, गांधी हत्येशी संबंधित याआधी झालेला तपास म्हणजे इतिहासावर पडदा टाकल्यासारखे आहे. नथुराम गोडसे याने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. असे दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले होते.
दरम्यान, महात्मा गांधी यांनी अखेरच्या वेळी जे कपडे परिधान केले होते. त्याचाही तपास शरण यांनी केला होता. दि. 30 जानेवारी 1948 ला हत्येच्या एक दिवस आधी महात्मा गांधींनी परिधान केलेले कपडे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. महात्मा गांधीजींच्या हत्येत नथुराम गोडसेशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीचा समावेश असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही, असे शरण यांनी आपल्या अहवालात म्हटले. सर्वोच्च न्यायालयातील न्या. एस.ए. बोबडे आणि न्या. एल.नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने शरण यांची एमीकस क्युरी म्हणून नियुक्ती केली होती