'गोडसे राष्ट्रभक्त होता'; प्रज्ञासिंहानंतर आणखी एका भाजपा आमदाराचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 08:26 AM2019-05-30T08:26:26+5:302019-05-30T08:27:51+5:30
म्हाऊ मतदारसंघातून आमदार असलेल्या उषा ठाकूर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान शहीद हेमंत करकरे आणि नथुराम गोडसे यांच्या वक्तव्यांवरून भाजपाच्या नवनियुक्त खासदार प्रज्ञासिंह यांनी वाद ओढवून घेतला होता. आता महात्मा गांधी यांची हत्या करणारा गोडसे हा देशभक्त होता, असे वक्तव्य भाजपा आमदार उषा ठाकूर यांनी केले आहे.
म्हाऊ मतदारसंघातून आमदार असलेल्या उषा ठाकूर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी हो, असे उत्तर देत नथूराम गोडसेला मी राष्ट्रभक्त मानते असे म्हटले आहे. गोडसे एक राष्ट्रवादी होते. त्यांनी आयुष्यभर देशाची चिंता केली. त्यावेळी काय परिस्थिती असेल जो त्यांनी असा निर्णय घेतला, हे त्यांनाच माहित असेल, असे ठाकूर म्हणताना दिसत आहेत.
महत्वाचे म्हणजे उषा ठाकूर या मध्य प्रदेशच्या भाजपा उपाध्यक्षा आहेत. वाद उत्पन्न झाल्यानंतर हा व्हिडिओ एडिट केलेला असल्याचे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमे सारखे सारखे गोडसे राष्ट्रभक्त होते का, असे प्रश्न विचारत असतात, अशी टीका भाजपाचे नेते बाबू सिंह रघुवंशी यांनी पीटीआयशी बोलताना केली आहे.
उषा ठाकूर यांचा व्हिडिओ एडीट केलेला आहे. एक विशिष्ट शब्द पकडून त्याला दाखविले जात आहे. हा विनाकारण तयार केलेला वाद आहे, असे ते म्हणाले.