गोडसेचं उदात्तीकरण म्हणजे देशभक्ती नव्हे, तर राष्ट्रद्रोह- दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 05:42 PM2019-05-16T17:42:58+5:302019-05-16T17:43:08+5:30
नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.
नवी दिल्लीः नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. आता काँग्रेसनंही साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेस नेते आणि भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात लढणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी नथुराम गोडसेवरच्या साध्वीच्या विधानावरून मोदी, शाह आणि भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. भाजपानं साध्वीच्या या विधानावर देशाची माफी मागावी. मी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विधानाचा निषेध करतो.
नथुराम गोडसे एक हत्यारा होता. त्याचं उदात्तीकरण करणं ही देशभक्ती नव्हे, तर तो राष्ट्रद्रोह असल्याचंही दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. साध्वींच्या 'त्या' विधानावरून भाजपानं हात वर केले आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या त्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून, त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी, असं भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं आहे.
Digvijaya Singh, Congress LS candidate from Bhopal on Pragya Thakur's remarks: Modi ji, Amit Shah ji & the state BJP should give their statements & apologize to the nation. I condemn this statement, Nathuram Godse was a killer, glorifying him is not patriotism, it is sedition. pic.twitter.com/HWp3ZMzREZ
— ANI (@ANI) May 16, 2019
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी मिळाल्यापासूनच साध्वी प्रज्ञा सिंह या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, आज त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा त्यांनी देशभक्त असा उल्लेख केला आहे. ''नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील. जे लोक त्याला दहशतवादी म्हणतात. त्यांनी स्वत:मध्ये एकदा डोकावून पाहावे. या निवडणुकीमधून अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे, असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले होते. तर काही दिवसांपूर्वी शहीद हेमंत करकरेंसंदर्भातही त्यांनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळीही त्यांना त्या विधानावरून विरोधकांनी धारेवर धरलं होतं.