विरोधकांकडून राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न- गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:32 AM2020-01-04T04:32:13+5:302020-01-04T06:41:03+5:30
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दहा दिवस कार्यक्रम
मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत एक तर विरोधकांचा गैरसमज झाला आहे किंवा ते जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे पक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रचार करत आहेत, ते राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला.
सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत इंडियन मर्चंट चेंबर्स येथे शुक्रवारी ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायद्याला सर्वांनी खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजे. कारण या कायद्यामुळे शरणार्थींना चांगले दिवस येतील. हा कायदा अचानक आणलेला नाही. भाजपने याबाबत आपल्या घोषणापत्रात आश्वासन दिले होते. भाजप सरकार जनहिताची अनेक कामे करत आहे. विरोधक सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. तो दूर करण्यासाठी भाजप मुंबईत १० दिवस जनसंपर्क अभियान कार्यक्रम राबविणार असून, या अंतर्गत तीन कोटी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले की, या कायद्यामुळे विदेशात त्रास सहन करणाऱ्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्वाची संधी मिळणार आहे. यावेळी मुंबई भाजपचे महामंत्री सुमंत घैसास, उपाध्याय हितेश आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष शरद चिंतन उपस्थित होते.