सोन्याच्या खाणींचा भाग आमचाच; चीनचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:36 AM2018-05-22T00:36:43+5:302018-05-22T00:36:43+5:30
अरुणाचल प्रदेशाजवळ हालचाली, भारत अस्वस्थ
बीजिंग : अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या तिबेटमधील ल्हुन्झे येथे भूगर्भातील सोन्याचे साठे बाहेर काढण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू केले आहे. तिबेट हा आमचा भाग असल्याने आम्ही करीत असलेली कृती वैध आहे असा दावा चीनने केला आहे. मात्र या हालचालींमुळे भारत अस्वस्थ आहे.
ल्हुन्झे येथील भूगर्भात सोन्याबरोबरच, चांदी व अनेक खनिजांचे साठे आहेत. त्यांची एकूण किंमत ६० अब्ज डॉलर होईल. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लू कांग यांनी सांगितले की, तिबेट हा चीनचा भूभाग असून तिथे काय करायचे ते आम्ही ठरवू. ल्हुन्झे येथे सुरु असलेले खाणकाम योग्यच आहे. चीन आपल्या प्रदेशाचे नेहमीच भूगर्भीय सर्वेक्षण करत असतो. त्यातूनच तिबेटमधील खनिजांच्या साठ्यांचा शोध लागला असून, तिथे आता खाणकाम सुरू आहे.
चीन व भारतादरम्यान आजवर झालेल्या करारांचे भारताने नीट पालन केले पाहिजे, असा अनाहूत सल्ला देऊन ते म्हणाले की, भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे संकेतही पाळायला हवेत. एखाद्या गोष्टीचा विनाकारण बागुलबुवा करु नये. (वृत्तसंस्था)
अरुणाचलवर कायमच दावा
अरुणाचल प्रदेश हा भारतीय प्रदेश असला तरी तो प्रदेश तिबेटचाच म्हणजे पर्यायाने चीनचाच भाग आहे, असा कांगावा त्या देशातर्फे करण्यात येतो. चीनची भूमिका कायमच विस्तारवादी राहिली असून त्याचे प्रत्यंतर डोकलाम वादाच्या वेळीही आले होते. भारताला लागून असलेल्या सीमाभागामध्ये चीन मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करीत आहे. त्यातूनही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.