सोने पोहोचले ४३ हजारांवर! १० दिवसांत २१०० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 03:41 AM2020-02-23T03:41:10+5:302020-02-23T06:52:18+5:30

लग्नसराईचा परिणाम; चांदीतही किलोमागे तीन हजारांची तेजी

Gold reached 43 thousand! 2100 rupees increase in 10 days | सोने पोहोचले ४३ हजारांवर! १० दिवसांत २१०० रुपयांची वाढ

सोने पोहोचले ४३ हजारांवर! १० दिवसांत २१०० रुपयांची वाढ

Next

- विजयकुमार सैतवाल 

जळगाव : भारतीय रुपयात सातत्याने होत असलेल्या घसरणीसह मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातीलही शेअर बाजार सतत गडगडत असल्यामुळे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे १० दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल दोन हजार १०० रुपयांनी तर चांदीमध्ये तीन हजारांची वाढ होऊन सोन्याचे भाव आणखी एका नवीन उच्चांकावर पोहोचले आहेत. शनिवारी सोने प्रथमच ४३ हजार रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले.

१२ फेब्रुवारीला सोने ४० हजार ९०० रुपयांवर होते. त्यानंतर १३ फेब्रुवारीला ४१ हजारांवर पोहोचले. त्यात वाढ होत होऊन १९ फेब्रुवारीला ४१ हजार ७५० रुपयांवर भाव गेले. २० फेब्रुवारीला ४२ हजार रुपये भाव झाल्यानंतर २१ फेब्रुवारीला पुन्हा ८०० रुपयांनी वाढ होऊन ते ४२ हजार ८०० रुपयांवर पोहोचले व शनिवारी ४३ हजारांचा टप्पा सोन्याने गाठला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात होत असलेली घसरण व लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने भाव वाढत आहेत. ते आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चांदीचेही भाव सतत वाढतेच
चांदीचेही भाव सतत वाढतच आहेत. १३ फेब्रुवारीला ४६ हजार रुपये प्रती किलो असलेल्या चांदीचे भाव १५ फेब्रुवारीला ४७ हजार रुपयांवर पोहोचले. १८ ला ४७ हजार ५००, गुरुवारी ४८ हजार रुपये व शुक्रवारी ४९ हजार रुपये प्रती किलोवर चांदी पोहचली. शनिवारी चांदी ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिली.

दीड महिन्यांत तीन नवे उच्चांक
सोन्याच्या भावाचा विचार केला तर या मौल्यवान धातूने दीड महिन्यात तीन नवीन उच्चांक गाठले आहेत. ७ जानेवारीला सोने ४१ हजार ४०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर २० फेब्रुवारीला ४२ हजार रुपये व आता २२ फेब्रुवारीला ४३ हजार रुपये प्रती तोळा, असे उच्चांकाचे भाव सोने गाठत आहे.

रुपयातील घसरणीसह शेअर बाजारातही घसरण होत असल्याने सोने-चांदीच्या गुंतवणुकीकडे कल वाढत आहे. त्यामुळे या धातूंचे भाव सातत्याने वाढत आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Gold reached 43 thousand! 2100 rupees increase in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं